स्वप्नं...
मी झोपतो तेव्हा हळूच बाहेर येतात
माझ्या डोळ्यांतून...दमल्या हातांतून...
थकल्या पायांतून...रंध्रारंध्रांतून...
आणि खेळत राहतात माझ्या उशीभोवती...
माझ अंथरूण विस्कटवतात....
माझी उशी खेचतात...
माझ्या घड्याळाचा गजर करतात....
माझ्या झोपेच्या तळ्यात सारी मिळून धिंगाणा घालतात...
मी कण्हतो...कूस बदलतो...हातावरे करून झटकू बघतो...
आणि मग उठतोच
तेव्हा ती झटकन परत शरीरभर जागच्या जागी जाऊन बसतात...
कुणी डोळ्यांत...कुणी हातांत...कुणी पायांत...
मग मी शोधत राहतो-मला जाग का आली?
माझ्या उशी अंथरुणासारखी झोप का विस्कटली ?
आणि उठून सरळ धाव लागतो
दिवसाच्या रिंगणात शर्यतीतल्या घोड्यासारखा...
तेव्हा ती खुदुखुदु हसत राहतात अंगभर
वडाला वसतीला आलेल्या भुतासारखी...
स्वप्नं...
छोटीछोटीच आहेत...गोजीरवाणी...
उचलून घ्यावीत अशी...हसरी...
पण त्यांच्या सुळ्यांना लागलेल
पिढ्यानपिढ्याचं चिकट, गरम रक्त पाहिलंत का?
-संदीप खरे
No comments:
Post a Comment