तिला मी बघितले जितुके, कुणीही बघितले नाही
तिला बघणेसुद्धा आता जरुरी राहिले नाही
तिच्या एकाच या स्पर्शातुनी पडल्या विजा लाखो
कसे आश्चर्य की माझे हृदय हे थांबले नाही !
त्यांनी मोजली माझीच पापे न्याय देताना
तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही !!
तिने ओठात घेता ओठ चढला ताप श्वासांना
तिचे हे वागणे वाटे तिलाही झेपले नाही !!
कसा सुचतो तिला शृंगार हे मज समजले नाही
कसे सुचले मज गाणे तिला हे उमगले नाही !
कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या ?
तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाची पाहिले नाही !!
कसे छळतेच आहे वाक्य ते दोघांशी आम्हा
तिला जे बोललो नाही, तिने जे ऐकले नाही !!
तिच्यासाठी निघाले प्राण, सरले भान जगण्याचे
तिचे काही स्वत:चे एकदाही बिघडले नाही !
तिने चुरडून मेंदी लावली हातास प्रेमाने
तिने आयुष्य माझेही असे का चुरडले नाही ?
मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवली सारी
असा झालो फरारी मी पुन्हा मज पाहिले नाही !!
असा होतीस माझा शब्द तू आत्म्यातला हळवा
तुला मी गिरवले होते; कधिही मिरवले नाही !
-संदीप खरे
No comments:
Post a Comment