Friday, November 30, 2012

मि.चंद्र आणि त्याची गँग

रात्रभर कल्लोळत होते मि. चंद्र आणि त्याची गँग...

दोन मजल्यांखाली , बंद दाराआडून, पडदानशिन खिडक्यांमधून सुद्धा
जेव्हा घरभर पसरल्या लाटांवर लाटा;
तेव्हा गुदमरून वळणावळणाच्या जिन्याने गच्चीवर पोहोचले.
पाहिले तर-
डोंगराच्या टेबलावर पाय टाकून बसलेल्या सावल्या
चमकत बागडणाऱ्या चटकचांदण्या वेट्रेसेस
आणि ज्यांची नावे नीटशी माहीत नाहीत
असे ध्रुव बिव तारे रात्र पिसत बसले होते !
रात्रभर कल्लोळत होते मि. चंद्र आणि त्याची गँग...

...
इतक्या 'वरच्या' लोकांत मिसळायची सवय नव्हतीच,
तेव्हा गेटवे औफ इंडिया वरून
ताज हौटेल पाहणाऱ्या माणसासारखा चेहरा करून
काहीतरी करत राहिलो-
बहुदा 'विचार' असेन....
झोप संपल्यावर येते ती जाग
आणि झोप न आल्याने विचारांचे जे माजते ते रण
आणि झोपेच्या अल्याडपल्याडचे हे दोघे
बेमालूम मिसळले तर ते जागरण....
...असे विचार करण्यापेक्षा झोपलो असतो तर बरे झाले असते !
कुत्री अखंड भुंकत होती तेवढे मात्र बरे वाटले;
चला, निदान कुणीतरी कशावर तरी आक्षेप घेते आहे !!.....
...
आस्ते आस्ते लपेटून घेत राहिलो थंडीच्या शालीवर शाली
पहिल्यांदा पातळ थर...मग जाड थर...मग बधिर थर...
इतक्या थंडीतही डासांची भूक मरत नाही का ?
किंवा इतक्या थंडीतही डासांची भूक का मरत नाही ?
का कोणतीतरी अमर गोष्ट दोन चेहऱ्यांनी वावरते आहे ?
दिवसा भूक आणि रात्री आशा ? किंवा व्हाईसवर्सा ? ......
....
मि. चंद्राच्या चिरुटाचे धुराचे लोट जमिनीवर येईस्तोवर
मध्यरात्र उलटून गेली....
मग मी त्याला धुके म्हणालो आणि
'धुक्यात आलीस भल्या पहाटे ' म्हणायचे कटाक्षाने टाळले !
अर्धवट जाग किंवा अर्धवट झोपेत
दु:खावर इतके थेट बोट ठेवू नये;
विशेषत: कवितेच्या हाताचे !.....
....
मग मी ठरवले की आता जागायचेच...तेव्हा झोप येऊ लागली...
तेव्हा मी मला आवडणाऱ्या मुलीला प्रेयसी मानून बघितले
स्वत:ला उच्चशिक्षित, स्थिरस्थावर प्रोफेसर मानून बघितले
आणि एकूणच जगण्याला दहाच्या पाढ्याइतके सोपे मानले....
फार झोप घसरते तेव्हा स्वत:ची इतकी फसवणूक क्षम्यच !....
या सगळ्या मानण्यांच्या धूसर आकृत्यांतून
छोट्याश्या गच्चीच्या चौकोनात
मी सैरावैरा खेळत राहिलो !
....
मला कोणी जागा म्हटले असते तर मी बोललो नसतो
आणि झोपलेला म्हटले असते तर ओरडलो असतो...
पण मि. चंद्राच्या गँगशिवाय नव्हतेच कोणी काही म्हणायला !-
आणि त्यांना तर अशा झिंगलेल्यांची सवय होती....
असे लोक अगदी निरुपद्रवी !
फार तर कविता करतील...सिगरेटी ओढतील...
आणि दिवसा नाहीच रहावले तर की झोपून जातील....
....
एवढे होईस्तोवर पहाट व्हायला अगदी थोडाच वेळ उरला
आणि धुके तर अगदी ओठांतून पोटापर्यंत !
साऱ्यांशी... म्हणजे प्रेयसी, माझे विद्यार्थी,
इतक्या पैशांचे काय करायचे ही विवंचना....
यांच्याशी झगडता झगडता पाय पोटाशी घेऊन
भिंतीला टेकून बसलो -
- तेव्हा अंगावरच्या काट्यांना घाबरून रात्र पळायच्या बेतात !
बाजूला वारा...कुठल्यातरी सावल्या...उलटे सुलटे शब्द....
फिकटसा प्रकाश आणि संथ, लांबलचक पांढरपणा.....
...
मग पायांनीच मला कधीतरी उचलले आणि खाली आणले 
तेव्हा आईच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह आणि दूध
दोन्ही एकदमच उतू गेले !
साली आपली जातच वटवाघळाची
असे तोंड न धुता बोललो
आणि माझ्या पारंपारिक, मध्यमवर्गीय गोधडीत
स्वत:ला खोलवर गुंडाळून घेतले...
मग दिवस आणि काहीतरी - बहुदा झोप - एकदम चालू झाले....

रात्रभर कल्लोळत होते मि. चंद्र आणि त्याची गँग...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment