एक तंबोरा होता माझ्याकडे
काळ्या शिसवीचा...चकाकता...
घराण्यात या हातातून त्या हातात वाजत आलेला...
येता जाता कोपऱ्यावर नेहमीच नजर जायची तिथे...
लहानपणी कोणीच हात लावू देत नसे त्याला
पण सांगत कि एक दिवस तुला घ्यायचाय तो हातात...
अन् मलाही होते ठाऊक निश्चित
कि एक दिवस घेणार आहे तो मी हातात...
खूप लक्ष असं दिलंच नाही मी त्याच्याकडे
पण अगदी धूळही बसू दिली नाही त्याच्यावर...
आणि तारा मात्र कटाक्षाने ठेवत आलो सुरात...
कोण जाणे कुठल्या क्षणी मैफिल चालू होईल...
आणि त्या चार तारांवर जन्म लावावा लागेल...!!
बरेच दिवस झाले...बरेच महिने...बरीच वर्षे झाली...
इमारती पडल्या..त्यातील माणसे कोसळली...
ओठांवर प्रौढत्वाची एक काळी लकेर आली...
वेगळ्या प्रकारची पण तारेवरचीच कसरत करत राहिलो...
येता जाता दिसायचा देवघरातल्या नंदादीपासारखा
वाटबघता तंबोरा...त्यावरची खानदानी, हस्तीदंती नक्षी...
हलकेच हात फिरवत म्हणायचो-
'होणार ! एक दिवस मैफिल सुरु होणार...'
घरी आलेले पाहुणेही तंबोरा बघायचे...हळहळायचे...
म्हणायचे- 'आमच्या घरी असा तंबोरा असता तरss...'
- आणि पुढे त्यांच्या कल्पनाच अडायच्या...!!
मी हसायचो...हसायचो फक्त...
तंबोऱ्याच्या जुन्या मैफिलींचा इतिहास सांगताना
त्यांच्यासह माझेही उसळायचे रक्त...
पाहुणे निघून जात...नजरेत ठेवून एक हळहळती सहानुभूती...
मी ही त्यांच्यामागच्या रिकाम्या घरात
छताझुंबरांना साक्ष ठेऊन
गवसणी चढवताना पुटपुटायचो,
होणार...एक दिवस मैफिल सुरु होणार...!!
असे अलगद उगवले मावळले सूर्यचंद्र
कि आठ आठ तासांच्या निजेचे थांबे घेत
कसे झपाटले आयुष्य कळलेच नाही...
फार दिवस खोकला बराच झाला नाही...
तेव्हा सहज वय पहिले...
आणि घाईघाईने येऊन तंबोरा हाती घेतला...
वाटले- याहून कुणी शंकराचे धनुष्य हाती दिले असते
तर बरे झाले असते...!
कोणीच बोलले नाही मग...
ना घर...ना दार...
ना भिंतीवरच्या तसबिरी...ना खालचा गालिचा...
केव्हाच उडून गेलेले असावेत देहातले प्राण
तसा गारठलेला अबोलाच सर्वत्र...सभोवार...
एखादा अटळ...घनगंभीर षड्ज लागून रहावा तसा !
वाट पाहत राहिलेल्या माझ्या शहाणपणाच्या
लक्षात येत गेले हळूहळू
मैफिल कधीच सुरु झाली होती खरं तर...
तंबोऱ्याच्या जन्मापासूनच !!
आता दिवाणखाण्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे
तिथे फार क्वचित खेळू देतो मी माझ्या मुलाबाळांना...
धक्का लागून तंबोरा फुटला
तर 'मैफिल चालू व्हायला हवी होती'
इतकेही वाटणार नाही त्यांना...
-संदीप खरे
No comments:
Post a Comment