Saturday, May 21, 2011

गाणे न शिकलेले गुलाम अली

गाणे न शिकलेला गुलाम अली
असू शकतो एखादा न्हावीही
कंगव्यात आलेली गिर्‍हाईकाची बट
रूपकच्या सात मात्रात कापून काढणारा,
व एखादा चांभार
झपतालाच्या पाचव्या मात्रेत
खिळा अचूक चपलेत घुसवणारा...

नशिबाने ज्यांचा हात तंबोऱ्यावर पडूच दिला नाही
असे कितीतरी भटकत असतील रानोमाळ
फुत्कारत फिरणाऱ्या नागसापांसारखे

त्यांची गाणी पडतात विखरून
चांदण्यातल्या मालाच्या छातीवर,
रानातल्या फांद्यांवर, नद्यांच्या लाटांवर...
पण त्यांच्याही छातीत असतो
तोच लखलखणारा सोन्याचा गोळा
तेजाळतो आतून
तोच स्वच्छ, ताजातवाना करणारा स्वयंसिद्ध सूर...
आयुष्याच्या अनवट रागात लीलया संचार करणारी
तीच स्वरांची झिंग...

गाणे न शिकलेले गुलाम अली
गात गात धार काढतात तेव्हा पान्हावते कपिला !
वल्ह्याने लाटा कापतात तेव्हा लाटाळते सरिता...!
मुक्त कंठाने चुंबून घेतात टीपेचे स्वर
तेव्हा डोंगररांगांचे माथे 'वाहवा' म्हणत झुकवतात माथे !

गाणे न शिकलेल्या गुलाम अलींचे स्वर विखुरतात पृथ्वीभर
खऱ्याखुऱ्या प्रार्थनेसारखे पोहोचतात अंतराळात...
लळा लावतात चंद्र सूर्य ताऱ्यांना...अगणित आकाशगंगांना...

बेफिकीर असतात गाणे न शिकलेले गुलाम अली
गाणे म्हणजे काय हे कधीच न कळता
गात गात उठतात
गात गात दिवसांच्या ओट्या भरतात
अन् स्वच्छ छातीने आयुष्य अंगावर घेत
गात गात झोपून जातात...

अजूनही सांताक्लॉजसारखा
वर्षानुवर्ष फिरणारा असदुल्लाखा गालिबचा आत्मा
त्यांच्या श्रांत चेहऱ्यावर
हात फिरवत फिरवत गुणगुणतो-
' खाक में क्या सूरते होंगी कि पीनहा हो गई |
सब कहा कुछ लाला ओ गुल में नुमाया हो गई |'

-संदीप खरे

No comments:

Post a Comment