Wednesday, January 11, 2012

Conscience

तुम्ही म्हटला होतात, की दिवा लावून द्यायची जबाबदारी आमची;
पण दिवा काही पेटला नाही...!
आणि माझे ना, थोडेसे लहान मुलासारखे आहे.
तुम्ही म्हटलात : दिवा लावून देऊ-
- तर आता दिवा लागला, तर मी हसेन
आणि दिवा नाही लागला,
तर मी रुसेन, संतापेन, खट्टू होईन किंवा काहीही...

मग तुम्ही घेऊन याल माझ्याकडे तुमची
’खरं तर दिवा लावायचाच होता; पण नाही जमले'ची
अनेक कारणं... अनेक अडचणी...
दिव्याचे फिलॅमेंट गेले होते,
किंवा फ्यूज उडाला होता...

इथपासून
-विजेच्या खांबावर झाड कोसळले
किंवा पॉवर स्टेशनच बंद पडले...
आणि मग त्याचीही उपकारणे
की कोळसा संपला
किंवा धरण भरलेच नाही

वा पाऊस पुरेसा झालाच नाही
पाताळापासून आकाशापर्यंत पसरतील
तुमची कारणे...

तुमच्या अडचणी;
पण माझे ना, थोडेसे लहान मुलासारखे आहे.
तुम्ही म्हटलात दिवा लावून देईन...

हो की नाही?
तर आता दिवा लागला, तर मी हसेन
आणि नाही लागला, तर रुसेन, संतापेन, खट्टू होईन किंवा काहीही...

मग काय होईल, की
तुम्ही माझ्या संवेदनशीलतेवर बोट ठेवाल,
म्हणाल, की "इतकं तर समजून घ्यायलाच हवं ना!”
आणि तुमच्यातच डोळे मारून म्हणाल :
"इतकं काय त्यात... ’डिफिकल्ट'च आहे जरा याच्याबरोबर राहणं!”
त्याच वेळी तुम्ही सावरत असाल तुमचे पांढरेशुभ्र पोषाख;
दिवा लावायच्या अजिबात नसलेल्या कळकळीतून
चिखलात न उतरता, पावसात न भिजता जपलेल्या
पांढऱ्याशुभ्र अभिमानातून!

आणि झोपलेल्या माणसाच्या ओठांतून लाळ गळावी
इतक्‍या सहजपणे म्हणाल, की
"आम्हाला काय दिवा लावायचाच नव्हता की काय...
आमचीही इच्छा होतीच ना... पण... आणि..”'

वगैरे वगैरे...
पण माझं ना, थोडंसं लहान मुलासारखं आहे.
तुम्ही म्हटलात, तसं दिवा लागला, तर मी हसेन
आणि दिवा नाही लागला, तर मी रुसेन, संतापेन, खट्टू होईन किंवा काहीही...

मग काय होईल, की दिवा न लागल्याने ’इतकं' अस्वस्थ होणाऱ्याला
तुम्ही ब्लड प्रेशर तपासायला डॉक्‍टरकडे जायला सांगाल,
एखाद्या सायकॉलॉजिस्टचे नाव सुचवाल
किंवा
आपल्या प्रिय देशाची ओळखच ज्या शून्याने आहे
त्या शून्यावर थोडीशी ध्यानधारणा करायला सांगाल...
सांगाल की "काळ अनंत आहे.
साठ-साठ सेकंदांत त्याला मोजणे आणि त्यानुसार वागणे
ही भातुकली आहे!
दिवा काय लागायचाच कधी न कधी तरी
आम्ही अमक्‍या वेळी लावू म्हटले, तरी सारे त्या वरच्याच्याच हातात आहे!”

तुमच्या दरिद्री, निर्बुद्ध, उथळ वर्तमानकाळाच्या जमिनीत दडलेल्या
आणि तुम्हाला खरोखर कधीही न आकळलेल्या
सोन्यासारख्या वेदपुराणातील सुभाषितांचे दाखले देऊन
तुम्ही अचानक तत्त्वज्ञ व्हाल;
दिवा लावतो म्हणून दिवा न लावताही!
पण माझे ना, थोडेसे लहान मुलासारखे आहे.
तुम्ही म्हटलात दिवा लावून देईन;
तर आता दिवा लागला, तर मी हसेन
नाही लागला, तर मी रुसेन, संतापेन, खट्टू होईन किंवा काहीही...

आणि मग एक दिवस काय होईल,
की तुमच्यातलेच कोणीतरी
दिवा लागला नाही म्हणून ऑपरेशन टेबलवर संपेल
थंडीत कुडकुडून मरेल
भुकेमुळे खपेल
किंवा दिवा न लागल्याने एखादी ट्रेनच्या ट्रेन
दुसऱ्या ट्रेनवर आदळून
तुमचीच काकी, बहीण, आई, मावशी, एखादी पिढीच्या पिढी संपेल;
पण तेव्हाही
दिवा लावून द्यायची जबाबदारी स्वत:वर न घेता
कमावलेल्या निर्लज्जपणाने तुम्ही गुरगुराल ह्याच्या-त्याच्यावर...
ढकलाल जबाबदारी एकमेकांवर...
तुमच्या बुद्धीचा एकही स्तर न खरवडता
माझी नजर चुकवत म्हणाल,
की
"खरं तर दिवा लावायचाच होता आम्हाला...
इतका पण विश्‍वास नाही का आमच्या मूळ शुद्ध हेतूवर...”
पण माझे ना, थोडेसे लहान मुलासारखे आहे;

आणि खरं तर माझे काय आहे ना,
की "दिवा लागला” तर "दिवा लागला”
किंवा "नाही लागला” तर "नाही लागला” एवढंच मला कळतं!


तुमची कारणे, अडचणी,
मनस्ताप, घरगुती भांडणे, राष्ट्रीय धोरणे,
जातपात, मोर्चे, समित्या, आयोग,
हळवेपण, माणुसकी, परोपकार, दयाबुद्धी
प्रचंड राजकीय, सामाजिक, धार्मिक वारसे-
काही म्हणता काही मला कळत नाही...!
दिवा लागला तर प्रकाश पडतो
नाही लागला तर अंधार असतो
हे तर देवघरात शांत बसलेल्या देवालाही कळते;
आणि पहिलीतल्या मुलालाही!


तेव्हा सांगायचे इतकेच,
की तुम्ही म्हटला होतात मला
(किंवा खरं तर स्वत:लाच)
की दिवा लावून द्यायची जबाबदारी आमची...
पण माझे ना, थोडेसे लहान मुलासारखे आहे.
तुम्ही म्हटलात दिवा लावून देईन
तर
आता दिवा लागला, तर मी हसेन;
आणि नाही लागला
तर मी रुसेन, संतापेन, खट्टू होईन किंवा काहीही...

- संदीप खरे

No comments:

Post a Comment