Tuesday, August 14, 2012

मांजर

मांजराला काSSही समजत नाही
तापलेल्या व्हिडीओवर ऊब घेत ते नुसते बसून असते...तासनतास.....
ते व्हिडीओवर...आणि आम्ही व्हिडीओतल्या सिनेमावर...तासनतास...
मांजराला काही समजत नाही !

त्याला तासकाटा माहीत नाही
त्याला मिनिटकाटा माहीत नाही
मुळात त्याला घड्याळच माहीत नाही-
-आणि तरीही घड्याळ असण्याला त्याची काही हरकत नसावी
नाहीतर एव्हाना त्याने ते
उंदीर किंवा झुरळ मटकावल्यासारखे
गिळून टाकले असते;
आणि मग तर मांजर मला मुलीच आवडले नसते.....
पोटात घड्याळ असलेल्या सजिवाचा मी फक्त तिरस्कारच करू शकतो !

पण त्याला काहीच समजत नाही
अगदीच बावळट...नको नको...अगदीच भाबडे म्हणू
ते चावत नाही, उंदीर खाते,
मऊ मऊ लागते आणि गोजिरवाणे दिसते-
- या आपल्या वैशिष्ट्यांचीही त्याला माहिती नाही;
आणि हे सारे माहीत करून घेण्याचा कंटाळाच आहे त्याला
आणि त्याला फिकीरही नाही कशाची...
मला स्वत:ला मांजर आवडत नसले
तरी मांजराचे हे एक फार आवडते !

'उद्या दिवस फार गडबडीत जाणार असं दिसतंय !'
असं जेव्हा मी म्हणतो,
तेव्हा ते कमान करून
फार तर एखादा आळस देते....
अशावेळी अर्थातच मी चिडतो
आणि त्याच्यादेखत दुधाचा ग्लास तोंडाला लावतो !
पण ते दुर्लक्ष करते आणि डोळे मिटते;
कुणीतरी त्याला दूध दिलेले असते किंवा देणार असते -
आणि याची पक्की खात्री असल्यासारखा त्याचा चेहरा निर्विकार असतो !
अशा वेळेला त्याचा चेहरा
रेल्वेतल्या 'विदाऊट तिकीट' साधूंशी खूप जुळतो !!
पण मांजराला हेही कळत नाही.......

घरातले सगळे सकाळी पांगायला लागतात
तेव्हा ते फ्लॉवरपॉटसारखे स्तब्ध बसून असते...
'कशासाठी...पोटासाठी' असं म्हणत म्हणत
सगळे घामट चेहऱ्यावर पावडर थापू लागतात
तेव्हा ते एकदाच 'म्यांव' करते;
दुपारी फक्त एकदाच 'इडियट्स !' असं म्हणून
ते ताणून देत असणार !!

थकलेल्या संध्याकाळी कुणीतरी
' आज बॉसला किंवा टीचरला कसा मस्का मारला '
हे सांगत असते
तेव्हा नेमके तेही
संध्याकाळच्या दुधासाठी
प्रत्येकाच्या पायाला घासत गोंडा घोळवत रहाते;
( मग अशा वेळी त्याला रागावताही येत नाही !)

रात्री आम्ही झोपेत कण्हत असतो
तेव्हा ते हळूच उठते आणि
किल्ल्यावरून दरीतले स्वराज्य पहावे
तसे कपाटावर चढून आपल्या राज्याकडे पहात बसते !
अशा वेळेला त्याचे डोळे विलक्षण चमकू लागतात.
कारण ते चोरून चोरून आम्हाला पडणारी स्वप्ने पहात असते !
आम्हाला पडणारी स्वप्ने
आणि एकेका स्वप्नाबरोबर पांढरा होत चाललेला एकेक केससुद्धा !
शक्य असते तर अशा वेळी मांजर खदाखदा हसले असते;
पण ते फक्त कापसाच्या गोळ्यासारखे बसून असते....
अशा वेळी मांजर खूप शहाणे वाटू लागते !

पहाटेच्या गजराला दचकल्या सारखे दाखवून
ते खास त्याचा असा
बावळट, भाबडा, आश्रित चेहरा धारण करते;
मग
जगात सगळ्यात मोठ्या आकाराचा मेंदू असलेल्या
मानवजातीचा एखादा प्रतिनिधी
एका बिचाऱ्या, य:कश्चित मांजराला
बशीत दूध ओतूSSन देतो....

आम्हीही दूध पितो...मांजरही दूध पिते....
पण मांजराच्या ते अंगी लागते !
आम्ही मरेस्तोवर जगतो...मांजरही मरेस्तोवरच जगते....
पण मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे होत नाही !
आम्हाला देव ठाऊक आहे...मांजराला तेही ठाऊक नाही...
पण मांजराचा आत्मा भटकत राहिल्याचे कुणीही ऐकलेले नाही !......

मला स्वत:ला मांजर आवडत नसले
तरी मांजराचे हे एक फार आवडते !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment