Saturday, June 15, 2013

थू तिच्यायला....

नाव…गाव…घर…

मी रमलोय खरा… पण हे माझं गाव नव्हे…
आणि मी सांगत फिरतो ना… ते माझं नाव नव्हे…
बदलायचंच आहे हे सारं…

माझ्या नावाच्या बॉक्समध्ये कसं पडत नाही एखादंही पत्र ?
का फक्त मीच लिहायचंय जीव तोडून… घुसमट सोसत ?
गाव गाठायचंय जिथे पत्ता नसूनही माझ्या दारात पडतील बोलकी पत्र…
आणि नावाचं काय…
सापडेलच चांगलंसं… फ्लॉवरपॉटमध्ये खोचलेलं
जोवर आतून फुलत नाही एखादी बाग
तोवर एवढ्यावरच भागवू !

हा कुलुपाआतला चौकोन
म्हणजे माझं घर नव्हे काही,
मी आपला असतो इथे दिवसरात्र;
अष्टौप्रहर भोगून काढतो
खाणं, झोपणं, टी. व्ही., गाणं…

……थू तिच्यायला !

पावसाळ्या रात्री ह्या चौकोनाच्या भोवती 
बेडकांची रांगच्या रांग डराव डराव करते ना;
तेव्हा वाटतं… आता हे
माझ्यानंतर ह्या भिंतीत राहतील 
माझी जायची वाट बघतात साले (?)
…………… माझ्याइतकीच (?)

कदाचित पुढच्या पावसाळ्यात
जेव्हा गोड पाण्याबरोबर
चार दोन खारट थेंब टपटपणार नाहीत त्यांच्या त्वचेवर
तेव्हा समजेल त्यांना
रिकामा पिंजरा
रावा उडोनि गेला !

इकडे बघ… हे बघ…
ते दूर डोंगरांच्या पलिकडे
जे न दिसणारं आहे ना
तिथे एक दगडी, शालिन, मऊ, जिवंत घर आहे
वाऱ्याच्या मापाचं… वारेमाप !
तिथे… तिथे जाणार मी…
सॉलिड ना…

जाणार… बदलणार… असं म्हणत म्हणत तसंच रहाणं….

थू तिच्यायला……

माझ्या गावात मध्यभागी मनोऱ्यावर
एक मोठं घड्याळ आहे
माझ्या घरातसुद्धा कवायत करणाऱ्या
दोन हातांचा गोल डबा आहे…
त्याच्या तालावर मी माझं नाव, गाव, घर आणि कंटाळा
शिवाशिवी खेळतात…
बदलणारंच आहे मी हे सारं…
नाव, गाव, घर……

थू तिच्यायला……

पहाट झाली का ?… झाली झाली….
'जाग' आली का ?… आली आली….
निघायचं का ?… निघा निघा….
कुलूप घ्या…किल्ली घ्या…कड्या लावा….
आता कशाला ? कशाला ?

थू तिच्यायला……

-संदीप खरे

No comments:

Post a Comment