Thursday, May 17, 2012

आपले आभाळ

आपले आभाळ मोजावे आपणच
घेऊ नयेत कुणाचीही तटस्थ निरीक्षणे...
सांदीफटीतून जर विशिष्ट ओळख नसलेले काही
हाताला लागले तर ते आपले आभाळच असते!

आपले आभाळ जोखावे आपणच
कुण्या दुसर्‍याने त्यात उड्डाणे भरण्याअगोदरच...
हात वर केल्यावर जे हाताला लागत नाही
ते ही असू शकते आपले आभाळच...

आपले आभाळ निरखावे आपणच...
कुण्या दुसर्‍याने त्यात सूर्यास्त चितारण्यापूर्वी...
आपल्या आभाळात आपल्या नकळत
खूपदा होत असतात सूर्योदय, उल्कापात, ग्रहणे...

आपले आभाळ कमवावे आपणच
घेऊ नये कुणाचा ढगही उसना
असे उसने उसने ढग, ग्रह, तारे हे सारे मिळूनसुध्दा
दरवेळेला आभाळ बनतेच असे नाही...

आपले आभाळ समजून घ्यावे आपणच
मजेत बघावेत सटासट पडणारे तारे...
त्या आदिम सीनियर आभाळाखाली
आपले ज्युनियर आभाळ तोलत
पटापटा आपले बेसिक क्लियर करून घ्यावे
दोन्ही एकरूप होईपर्यंत!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment