Sunday, July 8, 2012

लिहायला लागलाच आहे तर...

नुकत्याच कविता लिहू लागलेल्या,
अशक्त मुलाच्या आई वडिलांना डॉक्टरने सांगितले,
"आता लिहायला लागलाच आहे, तर लिहू दे त्याला कविता,
टॉनिक वगैरेही देतोच मी,
पण शक्यतो कविता लिहायची वेळ त्याच्यावर न आणलीत तर बरं!
असाध्यच रोग हा, पण प्रयत्न करु आपण...
पथ्ये अवघड, ती पाळणेही अवघड;
शक्यतो त्याच्यादेखत न भांडलात तर बरं !!

वाटतं हो आपल्याला...पण एखाद्याची मातीच असते भुसभुशीत,
तुम्हाला वाटेल सहज, साधी, नैसर्गिक शिवी
पण त्याच्यासाठी असु शकतं ते आयुष्य उसवणारं गीत!

पावसाळ्यात राहु देऊ नका एकटं
वा पाखरं दाखवू नका त्याला संध्याकाळची..
दिलीत तर तुमच्यासाठीच द्या कुशी
मिजास नको तिला लालन पालनाची !!

जगणं सुंदर असल्याचं सिद्ध करता आलं
तर अवश्य दाखवा करुन
कारण मृत्युच्या लेण्यांमधलं गूढ, सुंदर धुकं
त्याच्या मनात दाटलयं अगदी जन्मापासून !

नाती, मित्र, प्रेम, मारवा, पैसा..
सगळ्यावर ठेचा खाईलच तो यथावकाश
फळ पिकण्याआधीच घाई नको शक्यतो
वा भरावं त्याचं पोट म्हणून उपास तापास !!

आणि शहाण्यासारखा लिहितो म्हणून
शहाणा म्हणायची नको घाई...
तो लिहितो त्याच्यावरुन
त्याचाच उडतो विश्वास
सुकण्याआधी शाई !!

थोटे पडतीलच हात पाय.. घरामध्ये खचतेच भुई
साता जन्मांचे पापग्रह नाचत राहतील थुई थुई !
दिवसा झोप, रात्री जाग असे होवुन जाईल घर...
बोलूनसुद्धा उपयोग नाही, तो असेल रानभर !!

मुळात उपचार कमीच या रोगाला..
तुम्ही नाही तर दुसरं एखादं कारण असेलच हजर
त्यातुनही वाढलंच तर वाढू दे हे दुखणं
यातुनच ओसंडत येतो एखादा ज्ञानेश्वर !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment