Thursday, July 12, 2012

बाबा म्हणतो

बाबा म्हणतो- हाय जॉनी ! आई म्हणते- शंपू !
आजोबा म्हणती- खंडेराव ! आजी म्हणते- गणपू !!

बाबा म्हणतो ऑफिसात मी जेव्हा काम करत असतो,
तेंव्हा खरं तूच होऊन गल्लीत क्रिकेट खेळत असतो !
तुझ्यासाठी सारं..वाच, नाच, खेळ, गाऊन घे,
अर्धी स्वप्नं माझ्या डोळ्यात...अर्धी तुझ्या डोळ्यात घे !

आई म्हणते- एकुलता ना ! द्वाड तरी व्हायचे लाड !
असं हवं...तसं नको..एक कार्ट- नखरे लाख !!
हसतं तेव्हा आभाळ झरतं..रूसतं तेव्हा लागतो घोर
मोठ्याहूनही सांभाळायला अवघड आहे धाकटं पोर !!

आजी म्हणते- जन्मभर काढल्या खस्ता, केले कष्ट
तू म्हणजे त्या साऱ्याची शेवट गोड असली गोष्ट !
नुसतंच कथा-पुराण झालं..देव काही दिसला नाही
कुशीत येतोस तेव्हा कळतं कृष्ण काही वेगळा नाही !!

आजोबा म्हणती- संपली इनिंग...करण्यासारखं नाही काही
लावलं झाड फुलतं बघणं याच्यासारखं सुख नाही !
राग लोभ विसरून सारे तुझ्या छायेत बसून असतो
आणि तुझ्या डोळ्यात बाळा, देवाजीचं पुस्तक वाचतो !!

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई भाग २

No comments:

Post a Comment