Friday, July 19, 2013

रात्र रात्र सोशी रक्त...

खूप जागलो. इंजिनिअरिची सबमिशन्स, कधी कार्यक्रमांचे दौरे, नाटकाच्या रिहर्सल्स, 'बालगंधर्व'जवळ पुलावरच्या गप्पा, सायकलवरची भटकंती, कधी उगाचच एकट्यानेच वडाच्या पारावर दिलेला डेरा! एकदा तर शेवटची लोणावळा लोकल गाठून आम्ही ६-७ मित्रांनी मुद्दामून विनातिकिट प्रवास करून लोणावळा गाठलं. (ते थ्रिल कायदेशीररित्या इन्कमटॅक्स बुडवण्यात नक्कीच नाही!) टिसीनी पकडलं... त्याच्या केबिनमध्ये त्याच्याशी जिवाभावाच्या गप्पा मारल्यावर एक तासानी सोडलं. मग रात्र लोणावळ्याच्या बसस्टॅन्डवर घालवून, पहाटेची पुणे लोकल गाठली, ती लोणावळ्यापासून रेल्वे रुळावरून चालत जाऊन थेट मळवली स्टेशनवर! हरिश्चंदगड, रायगड, शिवनेरी सगळ्यांशी पहिली भेट घडली, ती रात्री वाटचाल करूनच!
...

मि. 'सूर्यवंशी', पहाट कधी पाहिल्येत का या जन्मात?'' आमच्या ओळखीचे एक 'नियमित काका' आहेत त्यांनी विचारलं! ते अगदी लहानपणापासून पहाटे उठतात, फिरायला जातात वगैरे. (रोज रोज इतकी वर्षे पहाटे पहाटे भेटून 'पहाट' यांना किती कंटाळली असेल ना! - असं आपलं उगाचच माझ्या मनात!) असो. त्यांचा तो 'स्वगर्वधन्य' प्रश्न ऐकून त्यांना म्हणालो - 'पाहिल्येत ना काका... खूप वेळा भेटलोय पहाटेला... पण काय आहे ना, पहाटेला नेहमी मागूनच मिठीत घेत आलोय मी!' त्यांचा नकळता चेहरा पाहून जरा विस्तार केला - 'म्हणजे असं, की पहाट आपली माझ्या बिछान्यात कुठे मी दिसतोय का शोधत असते आणि मी मध्यरात्रीची मुशाफिरी उरकून हळूच मागून येतो तिच्या आणि तिचा दवबिंदूच्या सुवासाचा चांदणशीतल देह हळूच कवेत घेतो... 'ती पण शहारते आणि मीही!!''

हे 'कलाकार जंतू' असलेच असा एक 'हन्त हन्त' भाव चेहऱ्यावर उमटवून ते निघून गेले... पण पहाटेसाठी काय छान सुचवून गेले काहीतरी!! ('ये खजाने तुझे मुमकिन है खराबों में मिले' ही ओळ जाम पटून जाते अशा वेळी...)

असो. पण खरंच रात्रीच्या या मुलीविषयी विचार करायला गेलं की किती किती आठवतं. खरं तर या आठवणी प्रत्यक्ष रात्रीच्याच... पहाट हे आपलं शेवटचं स्टेशन! मगाशी ते 'मध्यरात्रीची मुशाफिरी' म्हटलं ना, ते ऐकल्यावर काही जणांच्या भिवया उंचावू शकतात... पण ही त्यांना अभिप्रेत असलेली मुशाफिरी नक्कीच नाही! रात्रीचा प्रवास हा काही दरवेळी 'बदनाम' स्टेशन्सच घेतो असं मुळीच नाही!

रात्रीचं आणि माझं काहीतरी जमतंच एकूण... अगदी, मध्यरात्री जन्माला आलो होता ना, तेव्हापासून! अगदी सुरुवातीचं आठवतंय ते म्हणजे मी ६-७ वर्षांचा असताना, मला दामटवून झोपवता झोपवता 'दुष्ट' मोठी माणसं झोपी गेली की हळूच उठून छोट्याशा देव्हाऱ्यासमोर जाऊन बसे. गोष्टीची पुस्तकं कपाटात टाकून दिलेली असत, मग तिथलीच गजानन महाराजांची पोथी उघडून, देव्हा-यातल्या त्या एकमेव चालू असलेल्या क्षीण बल्बच्या उजेडात वाचत बसे. रात्र आपली होत राही! आणि मग त्यानंतर तर कसा कसा, किती किती आणि कशाकशासाठी जागलो ते आठवतंच नाही! आईनी कुरकुर केलीच तर 'या निशा सर्वभूताना'चा श्लोक ठरलेला! (माते, जेव्हा सारे जग झोपलेले असते, तेव्हा तुझ्या पुत्रासारखा संयमीच जागा असतो बरे!)

ऋतुगणिक रात्र बदलते ती ही किती अनुभवण्यासारखी! एखाद्या मुळात सुंदर मुलीनी कुठल्याही पेहेरावात सुंदरच दिसत रहावं तसं काहीसं! उन्हाळ्यात गच्चीवर निवांत गाद्या टाकून पहाटे गार पडलेल्या गाद्यावर, गोधडीच्या संकुचित, उबदार सीमाप्रदेशात स्वत:ला गुरफटवून घेणं असो किंवा हिवाळ्यात शेवग्याच्या झाडावरचे काळेभोर सुरवंट अवाक होऊन बघत, पोटातून गरम असलेली आणि आजीनी कालवून दिलेली मुगाची खिचडी दह्याबरोबर हाणताना आलेली सुखी उबदार जांभई असो, रात्र ही ग्रेटच! पावसाळ्यात मध्यरात्री पत्र्यावर सरसरणारा पाऊस तर ऐकावाच! मोठी सर आली की अक्षरश: गोंगाट मांडणारा, कधी बडा ख्याल मांडल्यासारखा खूप वेळ झिमझिमत राहणारा आणि थांबला तरी पागोळ्यातून थेंब थेंब तड तड वाजत राहणारा! मला तर अनेकानेक वाद्यांनी सजलेली, कधी हळुवार, तरी कधी एकदम भरभरून बोलणारी सिंफनी ऐकल्यासारखंच वाटत राहतं कित्येकदा!

या आणि अशा रात्रींनी किती कविता दिल्या आहेत मला... बाहेरचे कोलाहल शांत होत गेले की आतला एक एक दिवा हळूच पेटू लागतो. मग काहीतरी म्हणावसं वाटतं, काय म्हणायचंय ते हलकेच थोडंस दिसून येतं... मग हळूच शब्द येतात... विचारपूस करतात... कुठे, कसं बसू विचारतात... त्यांना हाताना धरून घरात घेतो... ते, मी आणि रात्र यांच्या गप्पा जमतात... चंद कधी पुनवेचा असतो, कधी बीजेचा तर कधी अमावस्येचाही; पण एव्हाना चांदणं ओसंडायला लागलेलं असतं ते खूप छान वाटू लागलेल्या मनाआतून! आणि मग जेव्हा पहाटेला मागून मिठीत घेतो, तेव्हा हळुचं तिच्या कानात कधी कधी एखादी प्रेमकवितासुद्धा गुणगुणू शकतो मी!

काय लाज लाज लाजते तेव्हा पहाट। सूर्य का उगवतो माहित्ये? जगाच्या कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यात अशी एखादी लाजरी, देखणी पहाट पाहता यावी म्हणून...!

-संदीप खरे

1 comment: