Wednesday, July 17, 2013

सिनेमाला न जाणे...

एकदा काय झालं...
एक होता ' तो ' ... एक होती ' ती ' ... आणि एक होता सिनेमा!
तिघांनी एकदा भेटायचं ठरवलं...
एकमेकांना पहायचं ठरवलं; ठरवलं; पण घडलं मात्र नाही...
कशाला तरी घाबरून, कशावर तरी रागावून ती आलीच नाही...
मग त्याने एकट्यानेच थिएटरसमोरच्या बाकड्यावर ठाण मांडलं...
ती येणार नाही माहित असून वाट पाहिली... ती आली नाहीच!
कधीच!
कुणी नव्हतंच बोलायला... मग त्याने त्याच्या हक्काचा कागद जवळ ओढला... कशासाठी कुणास ठाऊक; पण लिहू लागला...
--------

यु हॅव्ह टु बिलीव्ह...
प्रिय सहप्रवाश्या,
सिनेमाला न जाणे ही सुद्धा एक व्यथा असू शकते...

------

सा-याच व्यथादु:खांची दारं ठोठावून
विचारपूस करणारा मी... कुठल्याही व्यथेशी अस्पर्श राहू नये
याची काळजी घेणा-या
जगन्नियंत्याचे आभार...!
व्यथेच्या व्याख्यांवरून झालेले वादविवाद आठवतात का?
' डोक्यात पहिला रूपेरी केस दिसणे'
हीसुद्धा एक व्यथाच आहे
यावर वादविवाद रंगविताना
तू अधिकाधिक तेजस्वीपणे आशावादी बनत होतास...
असो...
' भरकटू नकोस' या तुझ्याच
चारी दिशांतून ऐकू येणाऱ्या उद्गारांची शपथ,
यंदाचा पावसाळा गर्भार आहे, प्रिय!
यु हॅव टू बिलीव्ह...
... या साऱ्या प्रकारावर थोडासा हस
आणि तुझ्या सबकॉन्शसमध्ये आणखी एक नोंद कर;
एवढ्याएवढ्यात मी जमाखर्च मांडायची हिंमत करतो आहे!
( उदाहरणार्थ... एक नकार जमा करायला
आयुष्यभराची एक जागा
खर्च करावी लागते; प्रिय!!)
एकमेकांमध्ये पावसाचा झिरमिरता पडदा धरून
तूही नव्हता का दिलास यासाठी थोडा दिलासा!!...
' चर्चा करताना चहा लागावाच का?'
लागावा प्रिय... चहा लागतोच!
शब्दांबरोबर जमिनीवरचे पाय सुटताना
' चहा गार होतोय' हे भान असावंच लागतं...
आणि याहीपलीकडे
कोणीतरी बरोबर असण्याची 'अव्यक्त' गरज ठणकते
तेव्हा चहाचा कढत घोट
आवंढा गिळायला उपयोगी पडतो... प्रिय...
गर्भार पावसाचे दिवस भरत आलेत, प्रिय
आणि तुझ्यासाठी एक सिनेमा राखून ठेवला आहे!
एका अविश्वासाची नोंद
मी राखून ठेवलेल्या राजिनाम्यासारखी
विचारांच्या वरच्या खणात जपली आहे!....
आय हॅव टू बिलीव्ह, प्रिय-
चालायला लागले की कोट्यवधी मैलांची अंतरं इंचाइंचाने का होईना
पण कमी होतच राहतात!
हे गर्भार पावसाचं त्रांगडं
तुझ्या उपरोधाच्या खंुटीवर टांगशीलही, प्रिय
पण 'गर्भार पाऊस प्रसवू शकेल एका मनाचा मृत्यूही'
या वाक्याने थिजशीलच थोडासा;
आय बिलीव्ह, प्रिय...!
त्रयस्थपणाची शाब्दिक चिरफाड करताना
एकमेकांच्या मृत्युचे दाखले नको देऊ या आपण;
ते असह्य होतील
इतके जवळ आलेलो नाहीत आपण
किंवा ते सहन होतील
इतके दूरही राहिलेलो नाहीत आपण...!
माझ्या प्रश्नांचे दोर माझ्याच हातात ठेवण्याची
सवय आहे मला...
भर पावसात निवांत चालायची सवय आहे मला
आणि माझ्या सवयी न बदलण्याची सवयही!
' भिजू नकोस ना ' हे शब्द कधीतरी
हाताला धरून खेचतीलही आडोशाला...
आय बिलीव्ह, प्रिय... मी वाट बघेन...
पाऊस... त्रयस्थ... फुलं... अविश्वास... सिनेमा...
' वाट बघणे ' हा स्वत:च एक रस्ता असतो, प्रिय ज्यावरून चालताना
कुठलेही वादविवाद, मतांतरे किंवा पर्याय संभवत नसतात!
लोकांच्या घरासमोर बांधलेली ' सहानुभूतीची कुत्री '
माझ्यावर अनेकवेळा भुंकली आहेत, प्रिय
आणि मी... हिंडता हिंडता भूकच थिजलेल्या भिकाऱ्यासारखा
निर्विकार हसू लागलो आहे....
पावलाखालचा जमिनीचा तुकडा जपावा
तसा ' वाट बघण्याची ' अक्षरे गिरवीत राहीन;
जगण्यासाठी काहीतरी घट्ट धरून ठेवणं भाग असतं, प्रिय!!
हा रस्ता... पाऊस... चहा... आपली अस्तित्व
कशी ठरल्यासारखी मिसळून आली आहेत!
आपलेपणाचा गंध हुडकावा लागत नसतो,
व्यथा हुडकाव्या लागतात प्रिय, स्वभावांच्या शपथा घालून!
आनंदाचे क्षण तर
फांदीफांदीवर लगडलेले असतात!
आणि तरीही मी आशावादी नाही;
कारण आशावादाची पाटी
वर्तमानात नेहमीच निराशेच्या तळ्यात उभी असते!
आनंदी म्हणून ओळखलं जाण्याचा
अट्टाहास कधीच नव्हता, प्रिय.... मी आनंदीच आहे....
... यु हॅव टू बिलीव्ह...
आय हॅव टू बिलीव्ह...
... सिनेमाला न जाणे ही सुद्धा एक व्यथा असू शकते!...

-संदीप खरे

No comments:

Post a Comment