Wednesday, February 3, 2010

अजुन उजाडत नाही ग !

अजुन उजाडत नाही ग !
अजुन उजाडत नाही ग !

दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग !
ना वाटाचा मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग!
पथ चकव्याचा, गोल,
सरळ वा कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी !
पान जळातून वाही ग...

कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे.. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग...

एकच पळभर एखादी कळ
अशी सनाणुन जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग !
ती कळ सरते... हूरहुर उरते अन् पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग…

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

तुटले

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....

विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...

उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...

आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

Tuesday, February 2, 2010

तुझ्या माझ्यासवे कधी

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

स्वर-सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

नामंजूर

नामंजूर! नामंजूर! नामंजूर!
जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

मला ऋतुंची साथ नको अन् कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहुर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर!

माझ्याहाती विनाश माझा! कारण मी!
मोहासाठी देह ठेवतो तारण मी!
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर
मज अब्रूचे थिटे बहाणे - नामंजूर!

रुसवे-फ़ुगवे,भांडणतंटे लाख कळा
आपला- तुपला हिशोब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन् घ्यावी
गगनाशी नेणे गार्‍हाणे - नामंजूर!

मी मनस्वीतेला शाप मानले नाही
अन् उपभोगाला पाप मानले नाही
ढग काळा ज्यातुन एक ही फिरला नाही
नभ असले मी अद्याप पाहिले नाही

नीती, तत्वे... फ़सवी गणिते! दूर बरी!
रक्तातील आदिम जिण्याची ओढ खरी!
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर!

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

मी हजार चिंतांनी

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो,
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वछंदी,
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो,
तो लंघुन चौकट पार निघाया बघतो

डोळ्यात माझीया सुर्याहुनी संताप,
दिसतात त्वचेवर राप उन्हाचे शाप,
तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते,
घड्वून दागिने सुर्यफुलांपरी झुलतो

मी पायीरुतल्या काचांवरती चिडतो,
तो त्याच घे‌ऊनी नक्षी मांडून बसतो,
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती,
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली,
नवसांची ठेवून लाच लावतो बोली,
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेवून जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार,
लपतो न परि चेहरा आत भेसूर,
तो फक्‍त ओढतो शाल नभाची तरीही,
त्या शाम निळ्याच्या मोरपीसापरि दिसतो

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

मेघ नसता वीज नसता

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले

भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

स्वर- संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर

अवचीत कधी सामोरे यावे
अन् श्वासांनी थांबून जावे
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर

मला पाहुनी दडते-लपते,
आणिक तरीहि इतूके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून
प्रश्न मला जो पडला नाही त्याचेही तुज सुचते उत्तर

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर

मेघ कधी हे भरुन येता,
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणि टप् टप् अन् इकडेही शाई झर् झर्

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर