Wednesday, October 5, 2011

धैर्य

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......

जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ’चाचपत’ राहते,
सध्या तिच्या असलेल्या हातांनी’
सध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापऱ्या कापऱ्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

- संदीप खरे

Saturday, October 1, 2011

सफरचंद

सफरचंदाने ना फक्त पडायचे असते
करायची नसते काळजी फांदीवरचे इतर सोबती पिकल्याची-‍‍ना पिकल्याची
करायची नसते काळजी फांदीखालील बेसावध डोक्यांची
वेळ झाली कळताक्षणी सारा गर गोळा करून
फांदीवरच्या फलाटावरून झाडाचे गाव सोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

मग ते पाहून कुणाला गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सुचू देत-ना सुचू दे
सुचल्याच्या आनंदात तेच सफरचंद कापून खाऊ देत-न खाऊ दे
पडणाऱ्याचे नशीब वेगळे सुचणाऱ्याचे नशीब वेगळे
सुचणाऱ्यागत पडणाऱ्याने नोबेल‍‍-बिबेल मागायचे नसते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

विचार नसतो करायचा की स्थितीज ऊर्जेची गतीज ऊर्जा कशी होते
नसते चिंतायचे की मरणासारखे त्वरण सुद्धा अंगभूत असते
नियम माहित असोत-नसोत नियमानुसारच सारे घडायचे असते
जर सफरचंद असेल तर त्याने टपकायचे असते
जर पृथ्वी असेत ते तिने ओढायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

सफरचंदालाही असतीलच की स्वप्ने, की कुणीतरी हळूवार झेलावे
किंवा उगवावे थेट चंद्रावर, आणि मग पिसासारखे अलगद पडावे
पण एकेक असे पिकले स्वप्न वेळीच देठाशी खुरडायचे असते
अन् चिख्खल असो वा माती असो, दिवस असो वा रात्र असो, फळ असो वा दगड असो
एकाच वेगात मधले अंतर तोडायचे असते
सफरचंदाने ना फक्त पडायचे असते

-संदीप खरे

Thursday, September 1, 2011

मैत्रिण

मैत्रिण माझी बिल्लोरी, बुट्टूक लाल चुट्टुक चेरी
मैत्रिण माझी हूं का चूं!, मैत्रिण माझी मी का तू !

मैत्रिण माझी हट्टी गं, उन्हाळ्याची सुट्टी गं,
मैत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणि बट्टी गं !

मैत्रिण रुमझुमती पोर, मैत्रिण पुनवेची कोर
मैत्रिण माझी कानी डूल, मैत्रिण मैत्रिण वेणीत फूल!

मैत्रिण मांजा काचेचा, हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मैत्रिण, बदामाचे गूढ मैत्रिण

मैत्रिण माझी अशी दिसते, जणू झाडावर कळी खुलते
ओल्या ओठी हिरमुसते, वेड्या डोळ्यांनी हसते

मैत्रिण माझी फुलगंधी, मैत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळीक अपरंपार, तरीही नेहमी स्पर्शापार

मैत्रिण सारे बोलावे, मैत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे

मैत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते,
पाण्याला का चव असते, अन् मैत्रिणीस का वय असते

मैत्रिण, थोडे बोलू थांब, बघ प्रश्नांची लागे रांग
दुःख असे का मज मिळते, तुझ्याचपाशी जे खुलते

मैत्रिण माझी स्वच्छ दुपार, मैत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मैत्रिण भरलेले आभाळ

-संदीप खरे

Sunday, August 28, 2011

तू

गौरगुलाबी चर्येवर
लालकेसरी टिकली टेकलेली...

लालचुटुक ओठांत
गडद गुलाबी गुपिते मिटलेली....

लालगुलाबी वस्त्रांत
सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...

मंद गुलाबी गंधाची
एक देहकुपी लवंडलेली...

सभोवताल्यांशी राखलेलं
एक फिकटं गुलाबी अंतर...

तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;
तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

-संदीप खरे

Wednesday, August 17, 2011

करार

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !
विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!
मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !
खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !

चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !
लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !
लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !

नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !
जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे
माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !
समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !
भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !
तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !
करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

Sunday, August 7, 2011

नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा होते निर्माण शक्यता
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकांच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
सांभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थांबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकंठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बंद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थांबलेला एक खरा खुरा नास्तिक
कंटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

-संदीप खरे

Friday, August 5, 2011

दाढी काढून पाहिला

दाढी काढून पाहिला अन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला

मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला

चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला

नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो अन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला

लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला

मी धुके ही पाहिले अन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला

मी पिझा ही चापतो अन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवंथत ठेवला

भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला

मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

-संदीप खरे