Saturday, December 31, 2011

ये ना

बंद तटांशी या लाटांशी कधी थांबती पाय
पश्चिम वा-यावरती मज हे ऐकू येते काय
जीव भाबडा जगावेगळा बोलू गेला काय
जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय
तुझ्या वीजेचे दान माझिया मातीला देना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

जरीही बघतो विसरून तुजला तरीही का ऐसे
नभास म्हणतो जमीन आणिक जमीन जळ भासे
कैफ तुझ्या स्मरणांचा कैसा अजून उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

खिन्न काजळी जरीही चमके आतून रुधिराशी
लखलख ओळी तुझीयावरच्या येती अधराशी
जन्म हारलो पणास याचे इमान उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे तुला पाहू दे ना
हिशोब पापा - पुण्याचे हे ज़रा राहू दे ना
क्षणापायी हा शाप युगांचा मला झेलू दे ना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

-संदीप खरे

Wednesday, December 28, 2011

नाजुक

इतकी नाजुक इतकी अल्लद
फुलपाखराहून अलवार
चालू बघता नकळत होते
वाऱ्यावरती अलगद स्वार इतकी नाजुक…...

निजल्या देही गवाक्षातुनी चंद्र
किरण ते पड़ता चार
लक्ख गोरटी रापून झाली
रात्रीत एका सावळ नार इतकी नाजुक……

इतकी नाजूक जरा तिचे मी
जोर देऊनी लिहिता नाव
दावीत आली दुसऱ्या दिवशी
अंगा अंगावर हळवे घाव इतकी नाजुक……

कशा क्रूर देवाने दिधल्या
नाजूकतेच्या कला तिला
जरा जलदसा श्वास धावता
त्यांच्या देखिल ज़ला तुला इतकी नाजुक……

इतकी नाजुक इतकी सुंदर
दर्पण देखील खुळावतो
ती गेल्यावरही तो क्षणभर
प्रतिबिंबाला धरु बघतो इतकी नाजुक……

इतकी नाजुक की जेव्हा
ती पावसात जाऊ बघते
भीती वाटते कारण जळात
साखर क्षणात विरघळते इतकी नाजुक……

इतकी नाजुक की आता तर
तर स्मरणाचेही भय वाटे
नको रुताया फुलास असल्या
माझ्या जगण्यातील काटे इतकी नाजुक……

-संदीप खरे

Friday, December 23, 2011

आज मी आयुष्य माझे

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो...

शोधले माझेच पत्ते आत मी माझ्या किती
जग हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो...

ठरवले हे पाहीजे, ते पाहीजे , ते ही हवे
मागण्या ताज्या तवान्या मी थकाया लागलो...

मी सुखाला पाळले बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले मी गस्त द्याया जागलो...

गीत माझ्या लेखणीचे इतुके भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो...

मज न आता थोडकी आशा कुणी की म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो...

काय हे आयुष्य माझे , काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो...

-संदीप खरे

Wednesday, December 21, 2011

कसा चंद्र

कसा चंद्र! कसं वय !
कशी तुझी चांदण सय !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

अंगामध्ये भिनत्येय वीज !
नाही जाग,नाही नीज !
दंव पडतंय शब्दांवर,
धुकं येतंय अर्थावर !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

उभा आहे मस्त खुशाल !
अंगावर थंडीची शाल !
गुलाब तिच्या गालांवर,
काटा माझ्या अंगावर !
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

कशी मजा झाल्येय आज
शांततेची सुद्धा गाज !
फुटतंय सरं आतल्याआत !
जंतरमंतर झाल्येय रात !!
कसा निघेल इथुन पाय?
वेड लागेल नाहीतर काय !

कशी झुळूक हलकीशी...!
कशी हवा सलगीची...!
कसा गंध वाऱ्यावर !
राहील मन थाऱ्यावर ?!
कसा निघेल इथुन पाय?
वेड लागेल नाहीतर काय !

रात्र बोलत्येय ताऱ्याशी;
पहाट उभी दाराशी !
गूज आलंय ओठांशी
पण बोलावं तरी कोणाशी...?
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

चंद्र असा झरझरतोय...
अबोलाही दरवळतोय...
मला आलाय अर्थ नवा;
तिला ऐकु जायला हवा !!
कसा निघेल इथुन पाय ?
वेड लागेल नाहीतर काय !

तुजवरी लावला जीव
हे मुळात चुकले माझे,
मी पाऊस हुडकायाला
ग्रिष्माच्या गावा शिरलो...........................

- संदीप खरे

Friday, December 9, 2011

बारीश

बारीश से अक्सर मिला करता था मैं
बारीश से अक्सर मिला करता था मैं
और तुमसे भी कभी कबार...

इत्तेफाकन् मगर तीनों इकठ्ठा कभी नही मिले हैं हम
इत्तेफाकन् मगर तीनों इकठ्ठा कभी नही मिले हैं हम

मिन्नते तो बहुत की थी मैने
बारीश से भी, तुमसे भी... मगर खैर...

अब की बार थान ली है मैने
तुम दोनों को साथ साथ ही मिलने की
अब की बार थान ली है मैने
तुम दोनों को साथ साथ ही मिलने की

इसिलिये अब आँखोमेंही बारीश लिये घूमता हूँ मैं...
उन्ही गलियों में...

जहाँ इत्तेफाकन् कभी तुम मिल जाओ शायद...
मिल जाओ शायद...

-संदीप खरे

Thursday, December 1, 2011

किती ?- एक जनरल छापील फॉर्म

तू आवडतोस/तेस
तू खूप आवडतोस/तेस
तू प्रचंड आवडतोस/तेस
तू सॉलीड आवडतोस/तेस
तू अफाट आवडतोस/तेस
तुझ्यावाचून जगणे नाही इतका/की आवडतोस/तेस
श्वास घेणं शक्य नाही इतका/की आवडतोस/तेस
तू नसशील तर नसेन मी ही इतका/की आवडतोस/तेस

तो/ती खपून आता वर्ष होईल अवघं दीड
पण अजूनही आवडतंच त्याला/तिला
वाडीलालचं चॉकलेट आईस्क्रीम,
ब्राऊन शेडेड शर्ट/साड्या,
सनसेट, भीमसेन, पिकासो, परफ्युम्स...
आणिक हो !
आताशा ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस कलीगची कंपनीही
एक कप कॉफीसाठी (?)...
’तो’/’ती’ असली म्हणजे मन थोडं हलकं होतं...यू नोऽऽ

’तो’/’ती’ आवडतो/ते
’तो’/’ती’ खूप आवडतो/ते
’तो’/’ती’ चिकार आवडतो/ते
...तुझ्यावाचून जगणे नाही...
...श्वास घेणं शक्य नाही...
...तू नसशील तर नसेन मी ही...
.................वगैरे.....

-संदीप खरे

Wednesday, November 30, 2011

समुद्राकाठच्या कविता

-१
हा समुद्र...
हजार लाटांनी समजावतो आहे या तटाला
तरीही त्याचे ’जमिनपण’
प्रत्येक लाटेला ओसरवताना
रंगीतच होते आहे अधिकाधिक......!

-२
बदलते,मावळते रंग
गोंदवून घेण्याचा
मनस्वी छंद या वाळूला
खूप जुना !

-३
त्या मावळत्या तांबड्या टिकलीला
हे कपाळ रोजचेच...
युगानुयुगांचे अभंग पातिव्रत्य !

-४
दूरवर विरघळते आहे
आणखी एक संध्याकाळ
समुद्राच्या पाण्यात...
...तू कुठे आहेस, प्रिय ?
बघ, हे जीवघेणे विरघळणे ......

-५
खूप वरचे स्वर लागताहेत आज
अचूक आणि भिजलेले...
त्यात हा समुद्राचा अखंड खर्ज...
असेच गाणे येईल ?

-६
जायची वेळ ! वारा सुटलाय...
माझी परतती पावलंही
त्रयस्थपणे पुसतो आहे हा समुद्र !
दुसऱ्याला रडवणारी
कसली ही स्थितप्रज्ञता......प्रिय ?

-७
मी नसेन
तेव्हाचा समुद्र पाहायचा आहे......

-८
मी नसताना
खडकांच्या गळ्यात हात टाकून
उदास ह्सत असेल हा...
...असेल ना, प्रिय ?.......

-९
येतो...साऱ्यांनो...येतो...

-१०
...हुरहुर...
...लाटेगणिक...
...लाटाभर...

-संदीप खरे