कोणीच नाही विश्वास ठेवत
पण खोल मुळापाशी आहे मी चिवट
किती धावली वादळे, किती फिरले वारे
एक ज्योत बारीकशी ठेवल्येय मी तेवत…
दरवर्षीच धावत येतात काळेसावळे ढग
दरवेळेस बांधायचे धरण तरी काय…!
आभाळाला अर्थ नसतोच मुळी
मग वणवण फिरण्याचे कारण तरी काय ?
किती अर्धे प्रश्न टाकून गेलो मागे
किती काळ बाळगणार खांद्यावरती ओझे ?
दिवसाच्या दिवस तरी होतात हिरमुसलेले खिन्न
संध्याकाळ सुन्न आणि रात्र प्रश्नचिन्ह !
नुसत्याच हालचाली अन् काही कळत नाही
एका 'घुम्म' आवाजाने भरतात दिशा दाही
कोणी विनोद सांगते, म्हणते 'टाळी तरी द्या !
जमिनीवर पडला चेहरा उचलून तरी घ्या !''
समजत का नाही मला ? तरी तेच !
स्वत: च व्हायचे पाय… स्वत: च ठेच !
असे जरी असले तरी असेच असत नाही
काळ काही पत्ते खेळत जागीच बसत नाही
सगळ्यानआधी गृहीत धरतो मी काही गोष्टी
अंदाज खरे ठरतात…एवढ्याच साठी कष्टी !
खरे सांगू? रक्तातच पेरलय काही
म्हणून आघाड्या हरतो…युद्ध हरत नाही !
मस्त जगू, मस्त जेऊ, निवांत रात्री पडू
एवढे ठरवून सुद्धा मग जेव्हा येतेच रडू
रडता रडता सरळ मग आरशापुढे जातो
पाहतो माझेच सोंग आणि खूप हसून घेतो
असा'विनोदी' मुळात मी…स्वत:वरतीच हसत
कोणीच नाही विश्वास ठेवत
पण खोल मुळापाशी आहे मी चिवट….
-संदीप खरे
No comments:
Post a Comment