Thursday, May 6, 2010

वाया

कुणाचेच नसतात हक्क कुणावर
पण डोळे भरतातच ना…
'अपेक्षाच करू नये' अशा तरी
अपेक्षा उरतातच ना…
सगळ्यानआधी उरायचे शून्यच
पण जीव जडतातच ना…
हुंदके येतातच ना…
श्वास अडतातच ना…

पाखरे तरी काय…हवेच्या पिशव्याच
पण झाडात घरटी बांधतातच ना…
वाराच तो…दिसत सुद्धा नाही
पण फांद्यांचे झोपाळे हालतातच ना…
वृक्ष एका जागी थांबतातच ना…
उन्हासाठी सावल्या पडतातच ना…

कुणीही गात नसले तरी
सूर असतातच ना…
शांततेचे अर्थ कळायला
आवाज लागतातच ना…
मरणाशिवाय कळणे जगणे अवघड
अन् जगण्याशिवाय मरणे…
उरात हेंदकळण्यापूर्वी मौन
शब्दांच्या छात्या फुटतातच ना…

नाही ग नाही ! असे नसते काही-
इतक्या सहजपणे म्हणायचे 'नाही'…
नाही ग नाही ! इतके सोपे नसते रक्त
जशी फुटून वाया जावी कागदावर शाई…
नाही ग नाही ! ओसाड नाही हे सारे
पावसाचे स्वप्न कधीच वाया जात नाही
सार्‍याला वेळ दे थोडासा पण निश्चित
इथे कुणाला आहे जगण्याची घाई !

- संदीप खरे

2 comments: