Friday, May 7, 2010

आयुष्य

ते दुखरं आहे...हळवं आहे...
चार पावलांतच खूप ठेचकाळलय...
पण चाललंय...
गरीब, शहाण्या म्हाताऱ्यासारखं चाललंय...

त्याच्या कडे बलदंड स्नायू नाहीत,
धारदार सुळे नाहीत...
जमिनीत मान घालून चरणाऱ्या शेळीसारखं
जन्माला आलंय आणि मृत्यूकडे चाललंय...

आणि तरीही त्याला नाव ठेवायचा हक्क
माझ्यासकट कुणालाच नाही;
कारण माझं म्हणावं असं तेवढंच तर आहे !
मलाच येतो त्याचा खूपदा राग
आणि मलाच येते त्याची खूपदा दया...
डोंगरात हरवलेल्या वासरासारखं
चुकतमाकत आई शोधतंय...

त्याला ना कधी मी बोलणार,
ना हिडीसफिडीस करणार...
एकसंध दिसलाच कधी तर कुशीत घेईन
तोंडावरून हात फिरवेन,
जमेल तेवढी माया देत राहीन...

इनमीन साथ वर्षांसाठी तर आलं असेल बिचारं...
पडून राहील कुठल्यातरी कोपऱ्यात
कुणाच्या अध्यात ना मध्यात...

एवढ्यांची पोटं भरतात रोजच्या रोज
भाकरीचे चार तुकडे काही आकाशाला जड नाहीत !
अखेरचं 'निदान' तर केव्हाच झालंय;
मलाही आहे ठाऊक, त्यालाही आहे माहीत !!

-संदीप खरे

No comments:

Post a Comment