Saturday, July 14, 2012

मी आहे श्याम

मी आहे श्याम मित्र माझा राम
मी जातो शाळेमध्ये...राम्या करी काम !
रोज नाही- कधीतरी होते भेटगाठ
मी त्याला लाडू देतो- तो शेंगा आठ !
माझे वय नऊ आणि त्याचे वय नऊ
त्याच्या हाती घट्टे आणि माझे हात मऊ !
आवरून बिवरून रोज मी शाळेमध्ये जातो
रामू तेव्हा हॉटेलात कपबश्या धुतो !
मला म्हणती- श्यामूराजा, बाळा, शोन्या, मन्या
त्याला म्हणती- बैला, घोड्या...किती किती शिव्या !
माझ्या घरी पाच खोल्या, त्याच्या घरी एक
माझ्या घरी चित्रे; त्याच्या भिंतीवरती भेग !
पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो
पाऊस म्हणे थेट त्याच्या घरामध्येच येतो !
माझा बाबा लाल लाल कारमध्ये बसे
त्याचा बाबा दिसाआड गटारात दिसे !
आठवड्याला गणवेषाचे दोन मला जोड
रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त दोन !
थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले सात
रामू मात्र घाली फक्त काखेत दोन हात !!
माझे केस रेशिम रेशिम, विंचरलेले दाट
त्याचे केस विस्कटलेले, धुरकटलेले, राठ !
माझे गाल गोबरे गोबरे...खप्पड त्याचे गाल
माझे डोळे चमचमणारे...त्याचे डोळे लाल !
माझ्यासाठी साबण, शाम्पू, चंदनाची पुटे
राम्याजवळ जायला सुद्धा नको नको वाटे !
त्याला मला दोन डोळे, हात, पाय, कान
त्याला मला एक पोट, पाठ, डोके, मान-
तरी माझ्या ओठी कसे रोज हसू खेळे आणि त्याच्या
डोळ्यामध्ये कायमचे तळे !!
असा सारा घोळ आहे..तरी देवापुढे-
-मी ही हात जोडे आणि तो ही हात जोडे !!

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई भाग २

2 comments: