Sunday, September 16, 2012

मी ग्लासातील पाण्यावरती

मी ग्लासातील पाण्यावरती हळू एकदा मारून फुंकर
म्हटले पाहू होतो का ते जळ-वायूचा काही संकर
तरंग उठले फक्‍त जरासे,याहून काही नाही घडले
हासत हासत काच म्हणाली वारा इकडे पाणी तिकडे

मी काचांचे कुंड मनोरे टोलेजंगी बघता बघता
तोंड वासुनी मारत होतो तळव्याच्या चटक्यांशी गप्पा
तोंड वासले इतके की मग त्यात येऊनी पडले अंबर
गिळता अंबर जगास सार्‍या ऎकू आली माझी ढेकर

कधी एकदा लास होऊनी वेगासातून जाऊन आलो
नशीब ठेवून चक्रावरती फाश्यांसोबत गरगर फिरलो
इतका हारलो की स्वप्नांच्या छातीवरती आले दडपण
घामाघूम मी झोपेतंच अन्‌ लोळून आलो होतो घरभर

कार घेऊनी अलिशानशी कुणी कामिनी मला भेटली
बॉंड मला समजून पुढे अन्‌ अंगावरती जरा रेलली
दत्तगुरूंचे नाव घेऊनी ओठ ठेवले मी बोटांवर
आठवते मज हसला होता रस्तासुद्धा त्या स्वप्नावर

आणि एकदा असेच कोणी रागावून येता अंगावर
खाता खाता जोडे त्याचे हसूच आले मला अनावर
इतका हसलो इतका हसलो पाणीच आले डोळ्या झरझर
तोही हसला आणिक गेला अंगावरती टाकून भाकर

-संदीप खरे

Tuesday, September 4, 2012

म्हणालो नाही

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी' ते ही 'सांग' म्हणालो नाही.
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही ...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का ही नजरच ओली होती
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी'
जा! फिटले सारे पांग!'- म्हणालो नाही

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय लागला आतून वणवा सारा
पण वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग- म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग- म्हणालो नाही..

-संदीप खरे

Wednesday, August 29, 2012

मैखाना

व्हिस्की बरोबर करायचा असतो
स्वप्निल रोमान्स…क्षण दोन क्षणांचा
अन रमवर पडायचे असते तुटून प्रच्छन्न प्रेमिकासारखे….

व्होडकाचे करायचे असते स्वागत
बर्फाळ प्रदेशातून आलेल्या राजनैतिक पाहुण्यासारखे…

जिन असते
बायको आपली आपण सोडवू शकेल
अशा घरातल्या प्रश्नासारखी !

ब्रॅंडी असते अगदीच प्रासंगिक,
प्रत्येक ऋतूत एकदा भेटून जाणाऱ्या सर्दीखोकल्यासारखी….

बिअर मात्र असते आडवयीन, आडवाटेच्या मैत्रिणीसारखी…
कधीही, कुठेही भेटू शकणारी….
तुमच्यासकट नाही नाही म्हणत तुमच्या बायकोलाही पटू शकणारी…
कमी भेटली तर चुटपूट लावणारी…
जास्त भेटली तर डोकं दुखवणारी…
आणि भेटलीच नाही तर हुरहूर लावणारी….

-संदीप खरे

Tuesday, August 14, 2012

मांजर

मांजराला काSSही समजत नाही
तापलेल्या व्हिडीओवर ऊब घेत ते नुसते बसून असते...तासनतास.....
ते व्हिडीओवर...आणि आम्ही व्हिडीओतल्या सिनेमावर...तासनतास...
मांजराला काही समजत नाही !

त्याला तासकाटा माहीत नाही
त्याला मिनिटकाटा माहीत नाही
मुळात त्याला घड्याळच माहीत नाही-
-आणि तरीही घड्याळ असण्याला त्याची काही हरकत नसावी
नाहीतर एव्हाना त्याने ते
उंदीर किंवा झुरळ मटकावल्यासारखे
गिळून टाकले असते;
आणि मग तर मांजर मला मुलीच आवडले नसते.....
पोटात घड्याळ असलेल्या सजिवाचा मी फक्त तिरस्कारच करू शकतो !

पण त्याला काहीच समजत नाही
अगदीच बावळट...नको नको...अगदीच भाबडे म्हणू
ते चावत नाही, उंदीर खाते,
मऊ मऊ लागते आणि गोजिरवाणे दिसते-
- या आपल्या वैशिष्ट्यांचीही त्याला माहिती नाही;
आणि हे सारे माहीत करून घेण्याचा कंटाळाच आहे त्याला
आणि त्याला फिकीरही नाही कशाची...
मला स्वत:ला मांजर आवडत नसले
तरी मांजराचे हे एक फार आवडते !

'उद्या दिवस फार गडबडीत जाणार असं दिसतंय !'
असं जेव्हा मी म्हणतो,
तेव्हा ते कमान करून
फार तर एखादा आळस देते....
अशावेळी अर्थातच मी चिडतो
आणि त्याच्यादेखत दुधाचा ग्लास तोंडाला लावतो !
पण ते दुर्लक्ष करते आणि डोळे मिटते;
कुणीतरी त्याला दूध दिलेले असते किंवा देणार असते -
आणि याची पक्की खात्री असल्यासारखा त्याचा चेहरा निर्विकार असतो !
अशा वेळेला त्याचा चेहरा
रेल्वेतल्या 'विदाऊट तिकीट' साधूंशी खूप जुळतो !!
पण मांजराला हेही कळत नाही.......

घरातले सगळे सकाळी पांगायला लागतात
तेव्हा ते फ्लॉवरपॉटसारखे स्तब्ध बसून असते...
'कशासाठी...पोटासाठी' असं म्हणत म्हणत
सगळे घामट चेहऱ्यावर पावडर थापू लागतात
तेव्हा ते एकदाच 'म्यांव' करते;
दुपारी फक्त एकदाच 'इडियट्स !' असं म्हणून
ते ताणून देत असणार !!

थकलेल्या संध्याकाळी कुणीतरी
' आज बॉसला किंवा टीचरला कसा मस्का मारला '
हे सांगत असते
तेव्हा नेमके तेही
संध्याकाळच्या दुधासाठी
प्रत्येकाच्या पायाला घासत गोंडा घोळवत रहाते;
( मग अशा वेळी त्याला रागावताही येत नाही !)

रात्री आम्ही झोपेत कण्हत असतो
तेव्हा ते हळूच उठते आणि
किल्ल्यावरून दरीतले स्वराज्य पहावे
तसे कपाटावर चढून आपल्या राज्याकडे पहात बसते !
अशा वेळेला त्याचे डोळे विलक्षण चमकू लागतात.
कारण ते चोरून चोरून आम्हाला पडणारी स्वप्ने पहात असते !
आम्हाला पडणारी स्वप्ने
आणि एकेका स्वप्नाबरोबर पांढरा होत चाललेला एकेक केससुद्धा !
शक्य असते तर अशा वेळी मांजर खदाखदा हसले असते;
पण ते फक्त कापसाच्या गोळ्यासारखे बसून असते....
अशा वेळी मांजर खूप शहाणे वाटू लागते !

पहाटेच्या गजराला दचकल्या सारखे दाखवून
ते खास त्याचा असा
बावळट, भाबडा, आश्रित चेहरा धारण करते;
मग
जगात सगळ्यात मोठ्या आकाराचा मेंदू असलेल्या
मानवजातीचा एखादा प्रतिनिधी
एका बिचाऱ्या, य:कश्चित मांजराला
बशीत दूध ओतूSSन देतो....

आम्हीही दूध पितो...मांजरही दूध पिते....
पण मांजराच्या ते अंगी लागते !
आम्ही मरेस्तोवर जगतो...मांजरही मरेस्तोवरच जगते....
पण मांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे होत नाही !
आम्हाला देव ठाऊक आहे...मांजराला तेही ठाऊक नाही...
पण मांजराचा आत्मा भटकत राहिल्याचे कुणीही ऐकलेले नाही !......

मला स्वत:ला मांजर आवडत नसले
तरी मांजराचे हे एक फार आवडते !!

-संदीप खरे

Wednesday, July 18, 2012

मिसेस स्पायडरमॅन

स्पायडरमॅनची बायको म्हटली - आमचे हे भलते चिक्कट !
चिक्कट नुसते भिंतीपुरते कामं करतात सगळी फुक्कट !!
कुठल्या क्षणी लग्न केलं काय सांगू नशीब खोटं
नवीन घरात गेले तर हो घरात नुसती जळमटं !
घाईघाईट छत जमीन झाडायचीही सोय नाही
कुठल्या कोपऱ्यात बसले असतील काही काही
सांगवत नाही !!
एक ड्रेस घालून फिरतात...धुणं नाही...इस्त्री नाही
झब्बा नको...सूट नको...कसली म्हणून हौस नाही !
कसला मेला आचरट ड्रेस...तसेच जातात भटकायला
दाढी नको...आंघोळ नको...उठून लागतात लटकायला !
ढिम्म बघत राहतात नुसते; पापणीसुद्धा पडत नाही
काय नक्की मनात आहे...चेहऱ्यावरती कळत नाही !!
असं कसं घेऊन यांना लग्न-मुंजीत जायचं सांगा
उत्सवमूर्ती बाजूला अन यांच्यासमोर लागतात रांगा
पोरं बाळं लक्ष नाही...किती रडू...किती बोलू
पेपरमध्ये रोज फोटो त्याचं काय लोणचं घालू !!
पोरांनाही ऑडच होतं...एकदा शाळेत गेले होते
मास्तरसमोर जाळं टांगून उलटं लोंबून बसले होते !
बाहेरच्यांना हिरो बीरो..घरात नुसते शिराळशेठ
पुरुष मेले सगळे सारखे...घरात एक ! दारात एक !
घरात मी चोविस तास...बाहेर हे वाऱ्यावर
घरी परत येईस्तोवर जीव नसतो थाऱ्यावर !
लटकत जातात इकडे तिकडे..चिकटून बसतात भिंतीवर
समजा जाळं अडलं तर ? नि समजा डिंक संपला तर ?
खरं सांगू...बोलते यांना...पण मग येते माझीच कीव
दुसऱ्यासाठी कोण सांगा टांगून घेतो आपला जीव ? !!
अस्से हे अन अश्शी मी...नातं आमचं धाग्याचं
सोसायचं अन झेलायचं अन तरीसुद्धा भाग्याचं !!
एक मात्र आहे बरं...बाहेर जेव्हा काहीच नसतं
आमचं ध्यान...कसं सांगू...मलाच येऊन चिकटून बसतं !!

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई भाग २

Tuesday, July 17, 2012

बाबाच्या डोळ्यामध्ये

आई आई ये ना जरा... बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !
बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
आळीमिळी गुपचिळी पडलेला वारा !
हले नाही डुले नाही जणू काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो..
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजूनच कसनुसा दिसे !
विचारले- बाबा, काय पाहतोस सांग ?
बघे म्हणे आभाळाचा लागतो का थांग !
काय सांगू पोरी तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती जमीनही नाही !
चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम गाडा चालायचा कसा !
घोडा झालो तरी काही शिकलोच नाही
विकायच्या जगामध्ये टिकलोच नाही !
आणि मग उठुनिया कुशीमध्ये घेतो
ओले डोळे पुसुनिया ओली पापी घेतो
घाबरतो जीव बाबा असे काय बोले?
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले !
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कुणी नेला?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला ?.....
आई आई ये ना जरा बाबाकडे बघ
बाबाच्या डोळ्यामध्ये पावसाचे ढग !....

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई भाग २

Monday, July 16, 2012

कोण कोण वर्गामध्ये

कोण कोण वर्गामध्ये हात करा वर
जगण्याच्या हजेरीला सारेच हजर
माने आले मोने आले साने नेने आले
राणे आले गुणे आले काणेसुद्धा आले
खरे, भुरे, पोरे, वारे, गोरे, ढोरे आले
चावरे, हावरे, कावरे, डावरे, ननावरे आले
शिंपी, कोळी, साळी, माळी, शिकलगार आले
लोहार आले सुतार आले सोनारसुद्धा आले
टायरवाला आले तसे लोखंडवाला आले
बाटलीवाला आले मागून दारुवाला आले
ताकभाते, दहीभाते, दूधभाते आले
साखरे, गुळवे, गोडांबे नि दुधाळेही आले
पडवळ, काकडे, भोपळे आले कोथमिरे आले
मुळे आले, चावायला सुळे सुद्धा आले
कावळे आले, कोकिळ आले, बगळे, मोरे आले
साळुंकेही आले आणि पोपटसुद्धा आले
पिंगळे आले गरुड आले घारेसुद्धा आले
भारद्वाज आले तसे राजहंस आले
मेंढे, कोकरे, गायतोंडे, म्हैसकर आले
ढेकणे आले गाढवे, घोडे, शिंगरेसुद्धा आले
बकरे आले, लांडगे आले, वाघ हरणे आले
कोल्हे आले, तरस आले, गेंडेसुद्धा आले
दरोडे नि खुने तसे गोसावीही आले
चोरे आले पाठोपाठ जमादार आले
डोळे आले; औषधाला वैद्यसुद्धा आले
भुते आले तसे इथे देवसुद्धा आले !!
नावात न काही तरी टाकावी नजर
पसरले अजूनही किती जगभर !!!
कोण कोण वर्गामध्ये हात करा वर
जगण्याच्या हजेरीला सारेच हजर !!!

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई भाग २