Friday, June 29, 2012

इच्छा मेली

आता कसले हार तुरे हे तिला घालता
आदर करता नमस्कारही करता वाकून
आता बघता निरखून मुद्रा जवळ घेऊनी
आणि तरीही सुरक्षितसे अंतर ठेऊनी

इच्छा मेली

परवा परवा पर्यंत तर तुमच्याच घराचे
सतत वाजवीत होती ना हो ती दरवाजे
रात्री अपरात्री ती वणवण फिरता-फिरता
तुम्ही झोपला होता निवांत रजई घेऊनी

इच्छा मेली

भीक कुठे मागत होती ती तुमच्यापाशी ?
जरा बोलला असता वाक्ये दोन तिच्याशी
पाय तिला होतेच तिचे की
तुम्ही परंतु दिलीत शिक्षा उभे रहायचे जमिनीवाचून

इच्छा मेली

असे होऊन गुंगीत गेली होती शेवटी
भान तिला नव्हते उरलेले अंतापाशी
लोचट होती इतकी की मग स्थितीत त्याही
म्हणायची की अजून पाहीन श्वासांवाचून

इच्छा मेली

शेवट शेवट असायची ती इथेच कोठे
बोधीवृक्षाच्या वठलेल्या झाडापाशी
जाताच नव्हता प्राण तिचा हो काही केल्या
बुद्धसुद्धा थकलेला तिजला सांगून सांगून

इच्छा मेली

अन्नाचा कण एकही नाही तिला लाभला
घोट जलाचा देखील साधा नाही मिळाला
इथेच मेली होती ना ती टाचा घासत
घट्ट बांधलेल्या मुठीत काही हलवे लपवून

इच्छा मेली

बरेच झाले सुटली तीही अन आपणही
खत्रूड होती तिची कुंडली पहिल्यापासून
सदा मिळाले धक्के खसता आणि कसरत आणिक नफरत
असायची ती पण उद्याकडे डोळे लावून

इच्छा मेली

आता तिजला स्वप्न असे नाव देऊनी
छान मिळाली भिंतीवरली चंदेरी चौकट
नित्य आता हा धूपही जळतो पूजाही होते
हार खाऊनी मरता बसली हार पांघरून

-संदीप खरे

Tuesday, June 26, 2012

फिरायला जाताना....

फिरायला जाताना तरंगत जावे चांदण्यावर
आणि जमिनीची पापी घ्यावी तसे अलगद टेकवावे पाऊल…
असे अल्लद चालाल तेव्हाच येईल कळून
गच्च गवतगर्दीत आधीच दडलेली असते आपली चाहूल…

फिरायला जाताना असे हळूवार उच्चारावेत शब्द
की ऐकू जायला हवेत ते त्याच्या त्याच्याच वाक्याला!
इतक्या तरल शब्दांआड दड़लात तरच दिसेल
बुटावाचून धावती सिंड्रेला बाराच्या ठोक्याला…

फिरायला जाताना नुसतेच फिरत राहू नये
चंद्राचे तुकडे थोडे थोडे गोळा करत रहावे…
गवतात हिरवा, रात्रीत निळा
असे सारे थोडे थोडे रंग पेरत जावे…

फिरायला जाताना सगळे सगळे जावे
आपण जे जे नाही, ते ते सारे होऊन पहावे
देहासाठी शाल-टोपी आणि मनासाठी-
...तान्ह्या बाळाच्या जावळासारखे एक स्वप्न घ्यावे….!

-संदीप खरे

Friday, June 15, 2012

फडकतो झेंडा

फडकतो झेंडा जरी अजूनही
वेगळेच काही वारा बोले

दूर दिसे मेघ येतो रोडावत
भान हरपत चाललेले

अबोल ओढीचा राखला मी आब
तेणे रक्‍तदाब खाली वर

असे तुझे नाव गेले देहभर
रक्‍तात साखर उतरली

असा जिण्यावर उमटला वळ
छातीतून कळ शेवटची

किंवा काय मला हवे आहे हेच
उत्तराची ठेच खाऊ नको

कोण जाणे हेच चलन असेल
ज्या योगे मिळेल हात तुझे

फडकतो झेंडा जरी अजूनही
वेगळेच काही वारा बोले

- संदीप खरे

Friday, June 8, 2012

एक माणूस

एक माणूस...हिरव्यागार...भवतालातून... जातो सरकत
एक माणूस...गच्चीमध्ये...आडवी तिडवी...गाणी म्हणत
एक माणूस...झाडावरला...चिमणा बघतो...काळी मान
एक माणूस...चिमण्याचिमण्या...पंखांवरचे...बघतो भान
एक माणूस...एकटा हसतो...डोंगरदऱ्यात...रमू बघतो
एक माणूस...गच्चीवरल्या...पावसासारखा...पसरट होतो
एक माणूस...धुव्वाधार...घेऊ बघतो...आभाळउडी
एक माणूस...जपत राहतो...अंगामधली...हुडहुडहुडी
एक माणूस...आख्खा आख्खा...अर्धा अर्धा...भागून घेतो
एक माणूस...रंगत रंगत...हळूच मधे...घड्याळ बघतो
एक माणूस...टोले तास...अंगावरती...मिरवून घेतो
एक माणूस...सोयीस्करशी...आठवेल तेवढीच...कविता म्हणतो
एक माणूस...तरंगतो...दारं लावतो...वावरतो
एक माणूस...आपल्या घरास...आपले कुलूप...आपण लावतो
एक माणूस...असतोही...नसतोही...दिसतो तेव्हा
एक माणूस...भरंवशाचा...असा भरंवसा...कोणी द्यावा !
एक माणूस...पावा घेईल...बघता बघता...रावा होईल
एक माणूस...त्याचे काही...होण्याचेही...राहून जाईल

-संदीप खरे

Sunday, June 3, 2012

दोन डोळे

चल जीवा रात झाली गाठायाचे घर
दोन डोळे खोळंबले तिथे दारावर

इथे-तिथे नको करू चल ना माघारी
दारापाशी उभी कुणी वाट बघणारी
घरा-दारा चढे वाट बघण्याचा ज्वर
दोन डोळे खोळंबले तिथे दारावर

गावामध्ये कोसळला उधाण पाऊस
तुझ्या घरी नाही पण पडला टिपूस
तुझ्याविना आली तरी डोळ्यांतून सर
दोन डोळे खोळंबले तिथे दारावर

-संदीप खरे

Sunday, May 27, 2012

बॅचलर

बॅचलरच्या घरात मध्यभागी तरंगत रहाते आभाळ...
खिडकीबाहेर मान काढायची गरज रहात नाही त्याला !
आभाळही मळकट, जांभळे, काळसर...
धड ना वरती, धड ना जमिनीला...

बॅचलरचे घर मळते, बॅचलरचे कपडेही
बॅचलर उष्टावतो दिवस....अन्नाचे तुकडेही !
तो वैतागतो, रात्री बाराला घर साफ करतो
कधी सोडून देत स्वत:ला महिनोन्महिने माफ करतो !

त्याच्या खोलीला असतो एक खास बॅचलर वास
स्त्रीच्या हातांची अपूर्वाई वाटणारा वास...
तोच त्याच्या रिस्टवॉचलाही येतो
अपवाद फक्त कधीतरी पडणार्‍या स्वप्नांचा
ज्यात त्याच्या मनात मोगरा गंधाळून येतो...

तो कसाही झोपतो...डोक्यावर उशी, अंगाखाली रग
त्याला डास अंगाई गातात...तो मिट्ट झोपाळतो मग

त्याचे एक पाळलेले झुरळ असते
खूप प्रयत्न करूनही ते मेलेले नसते;
मग तो सोडून देतो नाद आणि पाळतोच त्याला सरळ
जसे स्वत:चे आनंदीपणही त्याने पाळलेले असते !

बाकी तक्रार, रडणे, दु:ख...
त्याच्या अस्ताव्यस्त वस्तूंसारखे
कधीतरी मधूनच हाताला सापडतात;
तो वापरतो आणि काम झाले
की टाकून देतो कुठेही-
कुठेही टाकले तरी ते चार भिंतीतच राहतात !

त्याच्या निब्बर तळव्यांखाली वाट सरत रहाते
ते त्याला कळत नाही...
दाढीचे खुंट वाढले की तो म्हणतो-
'बरे भाग्य ! आपल्याच गालफडांवर चालावे लागत नाही !'

ह्या भयाण विनोदाला तो हसतो...समोरचा आरसा...एखादी भिंत...
गणपतीचा फोटो...गीतेचे पुस्तक आणि चार्ली चॅप्लिनचे चित्र...

-संदीप खरे

Thursday, May 24, 2012

बब्बलगम

बब्बलगम तू बब्बलगम...

तोंडामध्ये कधीचे नाव
चघळत बसणे हाच स्वभाव
विश्रामाला नाही वाव
दात सांगती- ' चला, चबाव !'
किती चावले तरी नरम
सरली चव अन उरला गम...बब्बलगम तू बब्बलगम !

तोंडी फुटता स्वप्नफुगा
पुन्हा राहणे उगामुगा
अन जर ओठांवर फुटला
आयुष्यातून तो उठला !
त्वचा बोलते, 'हाय करम !'
शिक्षा सुंदर सनम सनम...बब्बलगम तू बब्बलगम !

तोंड सुगंधी जरी होते
कंटाळ्याची चव येते
थुंकून द्यावे ना वाटे
गिळणेदेखील ना जमते
अशी अवस्था ! असा जुलम !
दमवून टाकी हा हमदम...बब्बलगम तू बब्बलगम !

चावत बसता काळ सरे
म्हणे बत्तीशी, 'पुरे ! पुरे !'
उष्ण शहरे हात गरम
डोळेदेखील झाले नम
एकाहून हा एक सितम
रोना जादा ! हसना कम !...बब्बलगम तू बब्बलगम !

-संदीप खरे