दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..
तडातडा गारगार गरागरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..
थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना ओले ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..
उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..
अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर
सरीवर सर..
स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम-दिवस असे की
No comments:
Post a Comment