Tuesday, February 2, 2010

आताशा मी फक्त

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठला ही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले मुळात मजला प्रश्न नको आहे
या प्रश्नाशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भीती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखूष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्र ही उरली पूर्वीगत हौशी
बिलन्दरीने कलन्दरीची गीते मी रचतो

कळू ना येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
बुडून जाती अत्तरापरि जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

स्वर- सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- नामंजूर

No comments:

Post a Comment