लाही लाही ऊन ऊन लाही लाही झळा
जगण्याच्या डोक्यातून मरणाच्या कळा
भट्टीतून वाहे जणू वारियाचा झोत
लाल ढग मुशितून सारे जीणे ओत
मातीतून आकारेल पोलादी पुतळा
मृगजळातून दूर बुडालेला गाव
नसलेल्या जळी चाले नसलेली नाव
नसलेली वाट जाते नसलेल्या स्थळा
खुरटल्या झुडूपाचे सुकलेले ओठ
चघळत काटे भरे बकरीचे पोट
खपाटल्या पोटातून भुकेचा सोहळा
नाही नाही ऊन ऊन नाही नाही झळा
काळ्या काळ्या कोकिळेचा पालावला गळा
हाक ओली पाठवली नभातल्या जळा
स्वर- संदीप खरे
संगीत- संदीप खरे
गीत- संदीप खरे
अल्बम- कधी हे कधी ते
No comments:
Post a Comment