Sunday, February 28, 2010

जाब तुला रे कुणी पुसावा..?

अगतिक झालो,निष्पभ झालो…तरीही केला तुझाच धावा
रोखठोक मज आज बोलू दे…माणूसकीने ऐका देवा !
जाब तुला रे कुणी पुसावा…?

कुठे ओतशी हिमराशी अन् कुठे वणांचे गच्च तुरे
कुठे कोरडे वाळवंट अन् कुठे बनविशी सरोवरे
कुठे उभवीशी गिरिकंदरे…कुठे सपाटी मैलोमैल
किते पृथ्वी ही तहानलेली…कुठे घडे तीज सचैल स्नान
नक्षत्रांचे सडे सांडशी…कोटी कोटी हे ग्रह तारे
कुठे कुणाशी धडका घ्याया धुमकेतू हे फिरणारे
कुठे अचलसा ध्रुव कुठे हे तारे चमचम गळणारे
कुठे भयानक कृष्ण विवर हे काळालाही गिळणारे
निर्वाताच्या पोकळीतुनी कशास रचसी नाटक हे?
स्वत:च सारे अभिनेते आणि स्वत:च नाटक बघणारे
लाख सूर्य हे,लाखो पृथ्व्या,लाखो चंद्र विखुरलेले
ज्ञान थेंब भर,अज्ञानाचे सागर लाख पसरलेले
ब्रह्मांडीही मावत नाही,ह्रुदयी माझ्या कसा वसावा?

पंडित कुणी, कुणी धूरंधर,कुणी देखणे,कुणी महान
कुणी अडाणी,कुरूप कोणी,कुणा न जगण्याचेही भान
लेंढाराने त्रस्त कुणी अन् कुणी निपुत्रिक झुरणारे
कुणी उपाशी,कुठे अन्न हे व्यर्थ मातीला मिळणारे
फुलून येण्याआधी खुडशी जन्म कधी तू क्रूरपणे
मरण येईना म्हणून रडती कोणी कोठे दीनपणे
कुठे पूल परक्यातून जुळतो…कुठे आपुल्यातून दरी,
कुणी बनवते विश्वाला घर,कुणी परके आपुल्याच घरी
सुरवंटातून कधी सुरंगी फुलपाखरे उमलविशी
कोठे राजस कमळ फुलवूनि भवताली चिखल रचशी
जलथेंबांचे करशी मोती,मोत्यांची माती करशी ,
ज्याची त्याची मापे सारी काय हिशेबाने भरशी?
कुणास देशी राज्य पृथ्वीचे, कुणा कटोरा तू देशी
जे देशी ते का देशी अन् जे घेशी ते का घेशी?
कसे तुझे हे गणित कळावे कशा तुझ्या या स्वैर तर्‍हा ?
मातीत एका जन्म तरीही कुणी कोळसा कुणी हिरा…!
श्रद्धेच्या थेंबांनी कैसा हृदयामधला विझेल वणवा….?

स्वर- सलील कुलकर्णी,संदीप खरे
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- दमलेल्या बाबाची कहाणी

No comments:

Post a Comment