मी पप्पाचा ढापून फोन
फोन केले एकशे दोन
हेलो हेलो बोलतय कोण
हेलो हेलो बोलतय कोण
हेलो बोलतय कोण
ए हेलो
आमचे नाव घेलाशेठ
डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो शाजुक तूप
साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव
लक्ष्मीबाई मी जोशाघरची
चोरून खाते अंडा बुरजी
वरती कपभर दूध अन् साय
घरात आता कुणी न्हाय
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव
मी तर आहे अट्टल चोर
चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार
तारे उरले फक्त हज़ार
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट कुठला गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव
ढगामधून बोलतोय बाप्पा
चल चल मारू थोड्या गप्पा
बाप्पा बोलतोयस तर मग थांब
सगळ्यात आधी एवढे सांग
कालच होता सांगत पप्पा
तिकडे आलेत आमचे आप्पा
एकतर त्यांना धाडून दे
नाहीतर फोन जोडुन दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट
अर्धीच राहिलीय आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा
गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर
एकटेच गेले केवढे दूर
डिटेल सगळा सांगतो पत्ता
तिकडे पाठव आमचे आप्पा
बाप्पा…बाप्पा बोला राव
सांगतो माझे नाव अन् गाव
कसले नाव नि कसला गाव
रॉंग नंबर लागला राव
स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- अग्गोबाई ढग्गोबाई
No comments:
Post a Comment