Wednesday, February 3, 2010

व्यर्थ हे सारेच टाहो

व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

पैज जे घेती नभाशी, आणि धडका डोंगराशी
रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे,
श्वास येथे घ्यावयाचा, आग पाण्या लावण्याचा,
ऊरफाड्या छंद आहे, मृत्यु ज्यांना वंद्य आहे,
साजिर्‍या जखमा भुजांशी, आणि आकांक्षा ऊराशी,
घाव ज्यांचा भाव आहे, लोह ज्यांचा देव आहे,
माती हो विभुती जयांची, ही धरा दासी तयांची,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

शब्द लोळाचे तयांचे, नृत्य केवळ तांडवाचे,
सूरनिद्रा भंगण्याला छिन्नी-भाकीत कोरण्याला,
जे न केवळ बरळती गोड गाणी कोरडी,
जे न केवळ खरडती चंद्र-तार्‍यांची स्तुती,
झेप ज्यांनी घालुनी, अंबरांना सोलुनी,
तारका चुरगाळल्या, मनगटाला बांधल्या,
ग्रह जयांची तोरणे, सूर्य ज्यांचे खेळणे,
अंतराळे माळती, सागरे धुंडाळती ,
वन्हीला जे पोळती, रोज लंका जाळती,
ही अशी शेपूट जयांची, ही धरा दासी तयांची
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

हस्तकी घेऊन काठी, केशरी घालून छाटी,
राम ओल्या तप्त ओठी, राख रिपूची अन ललाटी,
दास ऐसा मज दिसू दे, रोमरोमांतून वसू दे,
सौख्य निब्बरशा त्वचेशी वेदना ही ठस ठसू दे,
थेंब त्या तेजामृताचा मज अशक्ताला मिळू दे,
कांचनातून बद्ध जिण्या परीस पोलादी मिळू दे,
जे स्वतःसाठीच वाहे रक्त ते सारे गळू दे,
रक्त सारे लाल अंती, पेशीपेशींना कळू दे,
अश्रु आणि घाम ज्यांनी मिसळोनी रक्तामधोनि,
लाख पेले फस्त केले आणि स्वतःला मस्त केले,
त्या बहकल्या माणसांची, त्या कलंदर भंगणांची,
ही नशा आकाश होते, सर्जराचा कोष होते,
ही अशी व्यसने जयांची, ही धरा दासी तयांची,
मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

No comments:

Post a Comment