Wednesday, February 3, 2010

अल्कोहोल

अरे बेगम बाजार तो हो आया मैं
लेकिन अनाज नही…हा कुछ
शीशे का समान ज़रूर लाया हूँ
खुदा ने कहा है…
बंदे तेरे खाने का जिम्मा मेरे सर पर
लेकिन पीने के बारे मे उसने कुछ नही कहा
सो पीने की ज़िम्मेदारी मैने ही लेली

रात्रीच्या उदरात उदासीन मळमळनारे अल्कोहोल
भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल

दुनियेसाठी टाकाऊ अन् नकोनकोसे गटार हे
माझ्यासाठी निर्झर होऊन खळखळणारे अल्कोहोल

हवाहवासा गंध जिण्याचा हवेत हलके विरताना
नको नकोसा दर्प होऊनि दरवळणारे अल्कोहोल

साथ कुणी इतुकी ना देते, हाक कुणाची ना मिळते
रक्तासोबत इमान होऊन विरघळणारे अल्कोहोल

घाव बैसता तडफडतो जीव ! ना उरतो ना जातोही !
शेपूट तुटकी पाल होऊनि वळवळणारे अल्कोहोल

जगास वाटे अनैतिक जे, निषेध करते जग ज्याचा
अशा अबोल दुखांवरही हळहळणारे अल्कोहोल

सन्मानाचे दिवस झेलतो, जरी कौतुके जग अवघे
तिच्या कटाक्षावाचून रात्री तळमळणारे अल्कोहोल

फना काढल्या मृत्यूवरती मोहून गेला मंडूक मी
जातीवंतसे जहर होऊनी सळसळणारे अल्कोहोल

रसायनांची किमया नामी ! यमदुतांचे कष्ट कमी !
हे मृत्युचे भाग्य होऊनी फळफळणारे अल्कोहोल

मी त्या पितो ! ते मज पिते ! दोघांमध्ये खेच सुरू...
पुरून उरूनी थडग्यापाशी भळभळणारे अल्कोहोल !

स्वर- संदीप खरे, सलील कुलकर्णी
संगीत- सलील कुलकर्णी
गीत- संदीप खरे
अल्बम- सांग सख़्या रे

No comments:

Post a Comment